You are currently viewing सावंतवाडीत विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबिराला २६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडीत विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबिराला २६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडीत विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबिराला २६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर यांचे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळपटू, राज्य पंच व प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकॅडमीच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित या शिबिरात सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला आणि मालवण तालुक्यांतील तब्बल २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीतील ज्येष्ठ बुद्धिबळपटू चंद्रकांत रणशूर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबईतील जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या अनुपमा शेटगे, कुडाळ येथील समीर राऊळ, प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर, मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस स्नेहा पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत रणशूर यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळाचे महत्त्व व त्याचे विविध फायदे समजावून सांगितले. मुक्ताई ॲकॅडमीकडून सातत्याने आयोजित करण्यात येणारी प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा व विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच मुक्ताई ॲकॅडमीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकत असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाळकृष्ण पेडणेकर यांनी आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू व राज्य पंच म्हणून मिळवलेले यश हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे रणशूर यांनी सांगितले.

समीर राऊळ यांनी आपल्या मुलाला मुक्ताई ॲकॅडमीत कौस्तुभ पेडणेकर यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणासोबतच बाळकृष्ण पेडणेकर यांच्या प्रगत मार्गदर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ओपनिंगपासून एण्डगेमपर्यंत सखोल प्रशिक्षण

शिबिरादरम्यान बाळकृष्ण पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना ओपनिंग, मिडलगेम, एण्डगेम, टॅक्टिकल गेम तसेच बुद्धिबळाच्या स्पर्धात्मक नियमांबाबत सखोल मार्गदर्शन केले. आगामी शालेय तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेण्यात आली.

कुडाळ, मालवण, वेंगुर्ल्यातही शिबिरे

दरम्यान, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ला येथेही लवकरच विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा