“उदय सामंत” पालकमंत्री…!!

अखेर मूळ सिंधुदुर्ग जिल्हावासीय,
“उदय सामंत” पालकमंत्री…!!

♦विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून कित्येक दिवस झाले, येईन येईन म्हणत आलेलं गेलं, आणि शेवटी शिवसेना, रा. काँग्रेस, आणि राष्ट्रवादी यांचं त्रिकोणी सरकार सत्तेवर आलं.

♦परंतु सरकार येऊनही त्यांच्यात योग्य समन्वय होत नसल्याने खातेवाटप करणं तारेवरची कसरत होती ती नाराजी नाट्यांच्या अंकांसहित पार पडली.

♦सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीन पैकी 2 आमदार शिवसेनेला निवडून देऊनही जिल्हावासीयांची या तिरंगी सामन्यात मात्र उपेक्षाच झाली. त्यामुळे आता जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? हा प्रश्न उभा राहिला. जिल्हावासीयांची नाराजी लक्षात घेता मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मूळ वेंगुर्ला, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन्मगाव असलेल्या उदय सामंतांच्या डोक्यावर सिंधुदुर्ग च्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवली गेली. आणि ते अपेक्षितच होतं. कारण उदय सामंत हे बरीच वर्षे सिंधुदुर्गातील शिवसैनिकांच्या संपर्कात आहेत, जिल्ह्याची त्यांना उत्तम जाण आहे.

♦उदय सामंत यांनी शिवसेनेचे उपनेते म्हणून समाधानकारक कार्य केलेले आहे, रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी गेल्या काही वर्षात शिवसेना वाढविली, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात शिवसेनेला त्यांनी एका विशिष्ठ उंचीवर नेऊन पोचवलं. जिल्हापरिषद, नगरपालिकेत सत्ता आणली. आणि स्वतःही चौथ्यांदा भरघोस मतांनी निवडून येऊन पक्षश्रेष्ठींचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

♦अगदी तशीच कामगिरी करून सिंधुदुर्गात सुद्धा सेना वाढावी, सर्व क्षेत्रात सत्ता यावी, या अपेक्षेनेच उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्गची धुरा सोपवली असेल. वैभव नाईकांनी उत्तम कार्य करून सेना वाढवली, पण त्यांना योग्य साथ इतर नेत्यांकडून मिळत नाही ती कमी उदय सामंत पूर्ण करू शकतात.

♦सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना लाखो, करोडोंचा निधी जिल्ह्यात आला, परंतु तो कुठे आणि कधी खर्च झाला की परत गेला हे मात्र कळत नाही. केसरकरांनी निधी आणला पण त्याचं योग्य नियोजन आणि विनियोग झाला नाही. जर तो योग्य ठिकाणी वेळेत खर्ची झाला असता तर आज सिंधुदुर्गात विकास पोरका झाला नसता.

♦केसरकर मंत्री म्हणून चांगले काम करत होते, परंतु प्रशासनावर त्यांचा अंकुश नव्हता, वचक नव्हता. त्यांच्या मवाळ धोरणांमुळे अधिकारी त्यांना जुमानत नव्हते. काम करायची धमक असूनही करून घेण्यात मात्र ते कमी पडले. त्यामुळे जिल्ह्यात विकास झालेला दिसलाच नाही.

♦सिंधुदुर्गात आज प्रामुख्याने ज्वलंत प्रश्न आहेत ते रोजगार….
ज्याच्यासाठी तरुण मुलं मुंबई, पुण्याकडे धाव घेतात, तर काही गोवा राज्यात ये जा करतात ज्यात कित्येकजण रस्ता अपघातात जीव गमावतात. मुंबई, पुण्यात गेल्याने गाव ओस पडत चाललेत.

♦दुसरा महत्वाचा म्हणजे कबुलयतदार गावकर हा आंबोली, चौकुळ गावांचा कित्येकवर्षं रखडलेला प्रश्न. आज सुटला उद्या सुटला म्हणेपर्यंत आश्वासनांच्या हिंदोळ्यावरच झुलताना दिसतो आहे.

♦सिंधुदुर्गात हत्तीं पाठोपाठ आता गवारेडे सारखे जंगली प्राणी शेती बागायतींचं नुकसान करू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. पिकवलेली शेती एकतर पाऊस बुडवून नेतो, अन्यथा हत्ती, गवारेडे तुडवून टाकतो. फॉरेस्ट खात्याकडे उपाययोजना, मदतीची मागणी केल्यास ते वन्यजीव विभागच सिंधुदुर्गात नसल्याने आपण हतबल असल्याचं सांगतात. सरकार कडून नुकसानभरपाई कधी मिळते कधी नाही, परंतु जी मिळते ती घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सुद्धा पुरत नाही.

♦असे अनेक प्रश्न सिंधुदुर्गात आजही प्रलंबित आहेत. नवीन पालकामंत्र्यांकडून सिंधुदुर्गवासीयांच्या असे कित्येकवर्षं रखडलेले प्रश्न तात्काळ सुटावेत अशीच अपेक्षा आहे.

♦उदय सामंत हे हुशार आणि कल्पक नेतृत्व आहे, त्यांच्यातील कलागुण निरखूनच मुखमंत्र्यांनी त्यांच्याकडे सिंधुदुर्गाची जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी पेलण्यास आणि पार पाडण्यास नक्कीच ते यशस्वी होतील, आणि समस्त जिल्हावासीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील.

♦उदय सामंत आपल्या नवीन इनिंगमध्ये किती यशस्वी होतात, आणि जिल्हावासीयांच्या कसोटीत खरे उतरतात, हे मात्र येणारा काळच ठरवेल….

प्रतिक्रिया व्यक्त करा