You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावा; त्रुटी दूर करण्याचे सिव्हिल सर्जनांचे आदेश

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावा; त्रुटी दूर करण्याचे सिव्हिल सर्जनांचे आदेश

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावा; त्रुटी दूर करण्याचे सिव्हिल सर्जनांचे आदेश

अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाची पाहणी; स्वच्छ पाणी, विद्युत व्यवस्था व औषधसाठ्याबाबत प्रशासनाला सूचना

सावंतवाडी :

अमरावती जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य प्रशासनाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विशाल रेड्डी यांनी रुग्णालयाची पाहणी करून आरोग्य परिचारिका व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.
रुग्णांना वेळेत आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. रुग्णालयाच्या विविध विभागांची पाहणी करताना आढळलेल्या त्रुटींबाबत डॉ. श्रीपाद पाटील यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
रुग्णालयातील विद्युत व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे वायरिंग लोंबकळलेल्या अवस्थेत आढळल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित विद्युत समस्या तातडीने दूर करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच रुग्णालयात रुग्णांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. औषधसाठ्याचाही आढावा घेऊन रुग्णांना आवश्यक औषधे वेळेत मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले. औषधसाठा अपुरा असल्यास त्याची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सव व गोपाळकाला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा वैद्यकीय व्यवस्था करण्याची मागणी
दरम्यान, गणेशोत्सव तसेच गोपाळकाला/दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांच्याकडे केली.
गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयात जादा डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच दहीहंडी उत्सवादरम्यान युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होतात. दहीहंडी फोडताना अपघात अथवा दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता उत्सवाच्या ठिकाणी डॉक्टर व परिचारिकेसह १०२ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
दहीहंडीच्या वेळेत १०८ व १०२ रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याची मागणी
दहीहंडी उत्सवाच्या काळात विशेषतः रात्री ७ ते १०.३० या वेळेत १०८ तसेच शासनाची १०२ रुग्णवाहिका डॉक्टरांच्या उपलब्धतेसह सज्ज ठेवण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
उत्सवादरम्यान एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास रुग्णाला तातडीने उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे रुग्णालयात जादा डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्यास आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यास मोठी मदत होऊ शकते, असे श्री. राजू मसुरकर यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या काळातही जादा डॉक्टरांची डीएमओ ड्युटी लावण्यात आल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल. सणासुदीच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या या मागणीची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा