नाशिक:
ज्येष्ठ साहित्यिका व महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा.सुमतीताई पवार यांना मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून, या पुरस्काराचे वितरण ४ ऑक्टोबर रोजी त्रंबकेश्वर येथे होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शिवचरण उज्जैनकर यांनी दिली.
प्रा. सुमतीताई पवार या प्रतिथयश साहित्यिका असून शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात देखील त्यांच्या साहित्याला मानाचे स्थान मिळाले आहे. प्रा.सुमती पवार यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून सातत्यपूर्ण लिखाण हे त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील वैशिष्ट्य आहे. दरवर्षी त्यांची नवनवीन पुस्तके वेगवेगळ्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित होत असतात. प्रा.सुमती पवार यांना डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव असल्याचे मानले जात आहे. साहित्य क्षेत्रात विविध स्तरावरून सदर पुरस्कारासाठी त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
