*विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी दिला नशामुक्त भारताचा संदेश*
कणकवली / तळेरे : महाराष्ट्र शासन,शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक २८ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी व युवकांमध्ये अमली पदार्थ तसेच विविध प्रकारच्या व्यसनांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या अनुषंगाने वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे येथे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले.
सध्याच्या काळात व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या बनली असून त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या आरोग्यासोबतच कुटुंब,समाज आणि पर्यायाने राष्ट्रावर होत आहे.विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवणे व त्यांच्यामध्ये निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे,हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.
या अभियानांतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती अभियान,व्यसनमुक्ती प्रतिज्ञा मोहीम,पोस्टर स्पर्धा व निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत व्यसनांचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व स्पष्ट करणारे निबंध लिहिले. तसेच जनजागृतीपर आकर्षक चित्रे व पोस्टर्स साकारली.विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेत समाजात जनजागृती करण्याचा संकल्प केला.
अभियानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.विविध घोषवाक्यांद्वारे व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य अविनाश मांजरेकर,प्राध्या.सचिन शेटये,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.अभियानाचे नियोजन प्राध्या. अन्वी गवाणकर व सहा.शिक्षक पी.एन.कानेकर यांनी सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या सहकार्याने केले.
