You are currently viewing हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचा कार्यकर्ता अभ्यासवर्ग उत्साहात

हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचा कार्यकर्ता अभ्यासवर्ग उत्साहात

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

हिंदू वीरशैव लिंगायत मंच, सांगली जिल्ह्याच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रचार पुस्तिका प्रकाशन व कार्यकर्ता अभ्यासवर्ग नुकताच चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, विश्रामबाग, सांगली येथे उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास डॉ. रवींद्र अरळी, दानेश तीमशेट्टी आणि हेमंत हरहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांच्या वैचारिक, संघटनात्मक व सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

अभ्यासवर्गाच्या पहिल्या सत्रात श्री. ईश्वर रायण्णवर यांनी ‘स्वतंत्र धर्म मागणीमागील षड्यंत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. वीरशैव-लिंगायत समाजासमोरील विविध वैचारिक व सामाजिक प्रश्नांचा आढावा घेत त्यांनी कार्यकर्त्यांनी विषयांचा अभ्यास करून समाजात वस्तुनिष्ठ पद्धतीने जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.

दुसऱ्या सत्रात ॲड. सुरेश दोडवाड आणि ॲड. अमोल बोळाज यांनी ‘अल्पसंख्य दर्जा, आरक्षण यांचे वास्तव आणि कायदेशीर तरतुदी’ या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्रामध्ये अल्पसंख्य दर्जा, आरक्षण तसेच संबंधित घटनात्मक व कायदेशीर तरतुदी यांची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. विविध सामाजिक प्रश्नांकडे कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

तिसऱ्या सत्रात सौ. गौरी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. समाजातील वैचारिक जागृती, सामाजिक सहभाग आणि कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत त्यांनी आपले विचार मांडले.

चौथ्या सत्रात डॉ. रविकांत पाटील यांनी ‘यापुढील कामाची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन केले. आगामी काळात संघटनात्मक पातळीवर कोणत्या प्रकारे काम उभे करावे, कार्यकर्त्यांनी समाजाशी अधिक प्रभावीपणे संपर्क साधावा आणि विविध सामाजिक उपक्रमांना गती द्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचाच्या वतीने विजयंत प्रकाशित ‘ लिंगायत स्वतंत्र धर्म – भ्रम आणि वास्तव ‘ आणि ‘ स्वतंत्र धर्म आंदोलन – देशविरोधी शक्तींचा सुनियोजित कट ‘ या प्रचार पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. अभ्यासवर्गामुळे कार्यकर्त्यांना वैचारिक विषयांचा अभ्यास, संघटनात्मक कौशल्ये आणि सामाजिक प्रबोधनाच्या कार्याची दिशा याबाबत मार्गदर्शन मिळाले.

संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘अभ्यासातून विचार, विचारातून संघटन आणि संघटनेतून समाजाची प्रगती’ या विचाराने कार्यकर्त्यांनी आगामी काळात अधिक व्यापक पद्धतीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. निलेश हिंगमिरे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा