फोंडाघाट बाजारपेठेत गणपती उत्सवाची लगबग सुरू; वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
फोंडाघाट :
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने फोंडाघाट बाजारपेठेत गणपतीच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, फुले, पूजेचे साहित्य तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.
मात्र, वाढत्या गर्दीसोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी वाहने, दुकानांसमोरील गर्दी आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तात्पुरती वाहतूक व्यवस्था, पार्किंगची नियोजनबद्ध सोय आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गणपती उत्सव आनंदात आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यासाठी ग्रामपंचायतीत मिटिंग लावून नियोजन करणे गरजेचे आहे.असे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी केदार रेवडेकर यांनी सांगितले.
