*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*माझा साहित्य प्रवास..*
साहित्य प्रवास, खरं म्हणाल तर ही फार दुर्मिळ व
अवघड गोष्ट आहे. काही काही व्यक्तींना एक ओळ सुद्धा लिहिता येत नाही. त्यात काही वाईट
गोष्ट आहे अशातला भाग मुळीच नाही. कारण देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या कला दिल्या आहेत. कुणाला चित्रकला कुणाला शिल्पकला. साहित्य
ही सुद्धा कलाच आहे ना? पण त्यासाठी लागते
तपश्चर्या. होय, तपश्चर्याच! …
साहित्य हे कधीच एकाएकी प्रसवत नाही. त्या
साठी वाचनाची प्रचंड बैठक लागते.अखंड व सतत वाचनानेही साहित्य लगेच प्रसवत नाही.
माझेच उदा. पहा ना.. तशी मी लहानपणापासूनच
वाचनवेडी आहे.अगदी लहानपणीही मी चांदोबा,
सरोजिनी बाबर यांची पुस्तके असे काहीबाही
वाचल्याचे व नियमितपणे पेपर वाचल्याचे आठवते. पुढे कॅालेजला पीडीला ॲडमिशन घेतल्यावर तर विचारूच नका. SSVPS College ची अख्खी लायब्ररी मी वाचून काढली.
फडके, खांडेकर, माडखोलकर, अत्रे, पुलं, हरिभाऊ आपटे,ना.ह.आपटे, ना.स. इनामदार,
वसंत बापट, असे कितीतरी लेखक मी झपाटल्या
सारखे वाचून काढले.फडके खांडेकरांची तर किती पुस्तके व कादंबऱ्या वाचल्या माहित नाही. लग्नानंतर KTHM ची
लायब्ररी हाती लागली. ललितचे खंडच्याखंड वाचले.
शिवाय नोकरीला लागल्यावर शिकवण्यासाठी
वाचन सुरू झाले. संतवाड्.मयासह सारेच वाचावे
लागे. असे करताकरता १९९२ साली अगदी ध्यानीमनी नसताना स्वयंपाक करतांना ओट्यावरच मी एकादमात दोन गंभीर कविता लिहिल्या. “जीवन” व “झुला” नावाच्या. मीच भयंकर
आश्चर्यचकित झाले. घरातल्या मंडळींनीही वाचल्या. ते ही माझ्या तोंडाकडे पहात राहिले.
आणि मग एखाद्या मुलाला नवे खेळणे मिळावे
तसा चाळा सुरू झाला. सुरुवातीला त्या कविता
अगदी प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. पण त्यातूनच मग सुधारणा होत गेल्या नि हळूहळू
कवितेची विस्तृत वाट सापडत गेली नि मी आज
ह्या स्थितीत येऊन पोहोचले. सुरुवातीला मी
बालकवितेकडे वळले. त्यातून १३ बालगीतसंग्रहांची निर्मिती झाली. २० गाण्यांची
सुंदर कॅसेट, (नामवंत गायक संजय गीते यांच्या
आवाजातील)२०१९ मध्ये मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रकाशित झाली. मग प्रवास सुरु झाला तो मोठ्यांच्या कवितेचा. त्याचीही १३ पुस्तके निघाली. असे करता करता गद्य लेखनासह माझ्या नावावर आज ३७ पुस्तके आहेत. पुरस्कार, सत्कार खूप झाले.अनेक अध्यक्षपदे भूषविली, प्रकाशने, भाषणे झाली
ज्यांची मी कधीही कल्पना केली नव्हती. अगदी
अकल्पित असा हा प्रवास आहे माझ्या साहित्याचा. दरवर्षी ३ ते ४ पुस्तके निघतात. आताही तीन सुंदर बालगीत संग्रह व “ चला
कापडण्याला” ची इंग्रजी आवृत्ती निघाली आहे.
दिवाळी नंतर त्यांच्या प्रकाशनाचा मानस आहे.
आजही दैवकृपेने मी अखंडपणे लिहीते आहे.
सुचेल तोवर लिहीत रहावे हेच आपल्या हाती आहे.लिहावे ते सकस असावे अशी माझी धारणा
आहे व तसा माझा प्रयत्न असतो. अर्थात, कविता
काही ठरवून लिहीता येत नाही. ती केव्हा, कधी,
कुठे सुचेल सांगता येत नाही. तरीही माझ्यातील
हाडाची शिक्षिका सदैव जागृत असते. त्यामुळे
अंतर्मानातून स्फुरते ते सकसच असते असे रसिकांच्या प्रतिसादातून मला कळते. नक्कीच.
असो. थांबते आता. धन्यवाद.
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
