विद्यार्थ्यांनी दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा
इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 6 हजार रुपयांची शिष्यवृत्ती;
अर्जाची अंतिम मुदत 10 सप्टेंबर
सिंधुदुर्गनगरी
विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संकलन अर्थात फिलाटेलीची आवड विकसित व्हावी, तसेच हा छंद म्हणून जोपासला जावा, यासाठी टपाल विभागामार्फत ‘दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येत आहे. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या योजनेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची निवड मुंबई मंडळ कार्यालयामार्फत आयोजित फिलाटेली क्विझ आणि फिलाटेली प्रकल्पाच्या आधारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 6 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, दरमहा 500 रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाणार आहे.
योजनेसाठी मान्यताप्राप्त शाळेतील इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थी पात्र आहेत. संबंधित शाळेत फिलाटेली क्लब असणे आणि विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे. ज्या शाळेत फिलाटेली क्लब नाही, अशा शाळेतील स्वतःचे फिलाटेली डिपॉझिट खाते असलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांकडे फिलाटेली डिपॉझिट खाते नाही, त्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फिलाटेली डिपॉझिट खाते उघडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळविलेले असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये 5 टक्के सवलत देण्यात आली आहे. या योजनेसाठीचे अर्ज दि. 10 सप्टेंबर 2026 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा डाक अधीक्षक, विभागीय कार्यालय, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी – 416812 या पत्त्यावर पाठवावेत.
फिलाटेली हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा आणि इतिहास, संस्कृती, कला व विविध विषयांची माहिती मिळवून देणारा उपयुक्त छंद असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी अथवा डाकघर अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्गनगरी – 416812, दूरध्वनी 02362-228520 येथे संपर्क साधावा.
