You are currently viewing मठ येथे मोटर सायकल व रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या अपघातात चौघे गंभीर जखमी

मठ येथे मोटर सायकल व रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या अपघातात चौघे गंभीर जखमी

वेंगुर्ले

वेंगुर्ला ते कुडाळ कडे जाणाऱ्या रोडवर मठ पेट्रोलपंप समोर बुधवारी २५ मे रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास रिक्षा व मोटरसायकल यांच्यामध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघाता मध्ये चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील मोटरसायकल स्वार व रिक्षामधील एक जण असे दोघांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. तर रिक्षा चालक व त्यांची पत्नी या दोघांवर वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये गाड्यांचे ही मोठे नुकसान झाले असून अपघाताची नोंद वेंगुर्ले पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

या अपघाताबाबत सौ. रूपाली परब यांनी वेंगुर्ले पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही रामघाट रोड वेंगुर्ला, येथील राजन परब हे चालवित असलेल्या तीन चाकी रिक्षा क्र एम एच 07 सी 3968 या रिक्षाने वेंगुर्ले रामघाट रोड येथे येत होतो. त्याच दरम्यान कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोंदयाळवाडी येथील मोटरसायकलस्वार सलमान शौकत शेख याने आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एम एच. 07 ए एल 2204 ही भरधाव वेगाने समोरून रिक्षाला ठोकरली. या अपघातामध्ये मोटरसायकलस्वार सलमान शौकत शेख आणि रिक्षा मधील आम्ही असलेले सौ. रुपाली राजन परब, वय -47, रिक्षा चालक राजन परब व सौ.परब यांच्या बहीण स्नेहलता गावडे वय 58 हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच मठ ग्रामस्थ आनंद सावंत,भूषण मळगावकर,मंदार कामत,राजन गावडे,दादा मोबारकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान परब यांच्या तक्रारी वरून वेंगुर्ले पोलिस ठाण्यात भा. द.वी कलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा