You are currently viewing सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी राजघराण्याकडून ७० गुंठे जागा विनामूल्य

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी राजघराण्याकडून ७० गुंठे जागा विनामूल्य

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी राजघराण्याकडून ७० गुंठे जागा विनामूल्य

राजघराण्याने सावंतवाडीच्या आरोग्य, शिक्षण व नागरी सुविधांसाठी ऐतिहासिक योगदान दिले; जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती

सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेपैकी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी श्रीमंत राजे खेमसावंत भोसले व त्यांच्या भगिनी श्रीमंत राणी भोसले यांनी सुमारे ७० गुंठे जागा शासनाला विनामूल्य दिल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली. सावंतवाडीकरांच्या आरोग्य सुविधांच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय असून, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे स्वप्न आता साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी संस्थानच्या काळापासून राजघराण्याने प्रजेच्या हितासाठी आरोग्य, शिक्षण, पाणी, क्रीडा आणि नागरी सुविधांसाठी जमीन व इमारती उपलब्ध करून दिल्याचा इतिहास असल्याचे मसुरकर यांनी सांगितले. त्याच परंपरेचा पुढेही वारसा जपला जात असून, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी शहरातील मोक्याची जागा विनामूल्य देण्याचा निर्णय हा त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
१८८८ मध्ये मोती तलावासमोर रुग्णालयाची उभारणी
सावंतवाडी संस्थानचे कै. राजे श्रीमंत बहादुर रघुनाथ सावंत भोसले यांनी मोती तलावासमोर रुग्णालयाची इमारत उभारली. १८ डिसेंबर १८८८ रोजी या रुग्णालयाच्या इमारतीचा शुभारंभ झाला. त्या काळात रुग्णालयाच्या बांधकामासाठी संस्थानकडून ४५ हजार ३५० रुपये खर्च करण्यात आले होते. रुग्णालयासाठी जागाही संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात आली होती.
प्रजेच्या आरोग्याची काळजी घेत या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. गरजू रुग्णांना औषधोपचार आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली होती, अशी माहिती मसुरकर यांनी दिली.
राणी जानकीबाई सुतिका गृहाचीही उभारणी
त्या काळात घरामध्येच प्रसूती होत असल्याची परिस्थिती लक्षात घेऊन राजघराण्याने महिलांसाठी स्वतंत्र सुतिका गृहाची उभारणी केली. राणी जानकीबाई सुतिका गृहाचा शुभारंभ ३ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. गरोदर मातांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या वास्तूने अनेक वर्षे रुग्णसेवा केली असून, संस्थान काळातील आरोग्यविषयक दूरदृष्टीचे हे उदाहरण असल्याचे मसुरकर यांनी सांगितले.
यानंतर याच परिसरात भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची उभारणी झाली. संस्थानच्या जागेवर सुरू असलेल्या या संस्थेतून हजारो विद्यार्थी डॉक्टर तयार होऊन रुग्णसेवेत कार्यरत झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण, पाणी आणि क्रीडा सुविधांसाठीही योगदान
सावंतवाडी संस्थानने केवळ आरोग्य क्षेत्रातच नव्हे तर शिक्षण, पाणीपुरवठा, क्रीडा व नागरी सुविधांसाठीही जमीन आणि इमारती उपलब्ध करून दिल्याचा दावा मसुरकर यांनी केला. पंचम खेमराज महाविद्यालयासाठी जागा देण्यापासून सावंतवाडी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी केसरी येथून पाणी आणण्याच्या व्यवस्थेपर्यंत विविध कामांमध्ये संस्थानचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रीडांगणे, जिमखाना मैदान, बसस्थानक परिसर, बाजारपेठा, रघुनाथ मार्केट, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, न्यायालय परिसर तसेच अन्य सार्वजनिक उपयोगाच्या जागांबाबतही राजघराण्याने योगदान दिल्याचे मसुरकर यांनी सांगितले.
राजघराण्याच्या योगदानाला मानाचा मुजरा
सावंतवाडीच्या विकासासाठी राजघराण्याने केलेल्या योगदानाचे स्मरण आजच्या पिढीने ठेवणे गरजेचे आहे. आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रांसाठी जमीन व सुविधा उपलब्ध करून देणे ही मोठी सामाजिक बांधिलकी होती. त्यामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी पुन्हा एकदा मोक्याची जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल राजघराण्याचे आभार मानत असल्याचे मसुरकर यांनी सांगितले.
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून २६ वर्षे कार्य
आपण माजी आमदार कै. श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्या सहवासात कार्य करण्याची संधी मिळाली. त्यांच्या विचारांचा आणि कै. भाऊ मसुरकर तसेच गुरुवर्य कै. शिवाजीराव भिसे यांच्या प्रेरणेचा आपल्या सामाजिक कार्यावर प्रभाव असल्याचे राजू मसुरकर यांनी सांगितले.
२००१ पासून रुग्णसेवेला प्राधान्य देत असून, रुग्णालय हेच मंदिर मानून जात, धर्म, पक्ष किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार न करता गरजू रुग्णांना मदत करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता लक्षात घेऊन जनहित याचिकेद्वारे विविध तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोरगरीब रुग्णांना उपचार मिळावेत, त्यांच्या नातेवाईकांना धीर मिळावा आणि योग्य उपचारासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहण्याचा संकल्प असल्याचे राजू मसुरकर यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा