You are currently viewing सावंतवाडीत ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बसेस दाखल

सावंतवाडीत ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बसेस दाखल

सावंतवाडीत ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बसेस दाखल

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण; गणेशोत्सवात प्रवाशांना मिळणार अधिक चांगली सेवा

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेसपैकी पाच नवीन बसेसचे आज सावंतवाडी बसस्थानकात आगमन झाले. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या बसेसचे पूजन करून श्रीफळ फोडत लोकार्पण करण्यात आले. यानंतर आमदार केसरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या बसमधून मोती तलावाची सफर केली.
यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले की, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यातून अत्याधुनिक बसेसचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३० गाड्या मंजूर झाल्या असून त्यापैकी सावंतवाडीसाठी १०, तर वेंगुर्ला व दोडामार्गसाठी प्रत्येकी ५ गाड्या देण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात सावंतवाडीत पाच नवीन बसेस दाखल झाल्या असून गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता या बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगली व आरामदायी सेवा मिळेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

बसस्थानकातील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविणार

सावंतवाडी बसस्थानकाचे काम सुरू असून गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसस्थानक परिसरातील खड्डे भरण्याचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असेही आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले.
या लोकार्पण सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, सभापती सुस्मिता जाधव, स्थानक प्रमुख गौतमी कुबडे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, अशोक दळवी यांच्यासह अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, राजन रेडकर, गजानन नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, राजू कुबल, हर्षद डेरे, सत्यवान बांदेकर, बबलू मिशाळ, क्लेटस फर्नांडिस, हेमंत बांदेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, गुंडू जाधव, विवेक म्हापसेकर, विशाल सावंत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा