You are currently viewing सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा

राजघराण्याकडून करोडो रुपयांची 70 गुंठे जागा विनामोबदला शासनाला सुपूर्द

सावंतवाडी :

सावंतवाडीकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर न्यायालयीन प्रक्रियेतून मार्गी लागला आहे. जनहिताचा व्यापक दृष्टिकोन ठेवून सावंतवाडी राजघराण्याचे सर्वेसर्वा श्री. खेमसावंत शिवराम सावंत भोंसले यांनी शहरातील मोक्याच्या ठिकाणची करोडो रुपये किमतीची 70 गुंठे जमीन महाराष्ट्र शासनास विनामोबदला दिली आहे. यामुळे रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला आहे.

मालिकी हक्काच्या या जागेबाबत उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान सावंतवाडी संस्थानच्या कुटुंबीयांनी वेळेत आवश्यक प्रतिज्ञापत्रे सादर करून पूर्ण सहकार्य केले. एवढेच नव्हे तर, रुग्णालयाच्या मंजुरीसाठी श्री. खेमसावंत भोंसले आणि श्री. लखमराजे खेमसावंत भोंसले यांनी वरिष्ठ शासकीय पातळीवर स्वखर्चाने वारंवार पाठपुरावा केला आहे.

सार्वजनिक आणि समाजहिताला प्राधान्य देण्याची सावंतवाडी संस्थानची परंपरा जुनीच आहे. यापूर्वीही संस्थानने सावंतवाडी गार्डन, शिल्पग्राम, आंबेडकर स्मारक, राणी जानकीबाई सुतिकागृह आणि नरेंद्र डोंगरावरील पाण्याची टाकी यांसारख्या अनेक सार्वजनिक उपक्रमांसाठी आपली जमीन विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे.

भूतपूर्व अधिपती श्रीमंत शिवरामराजे खेमसावंत भोंसले यांनी सुरू केलेली ही सामाजिक बांधिलकीची परंपरा सध्याच्या पिढीतील श्री. खेम सावंत भोंसले, सौ. शुभदादेवी खेम सावंत भोंसले, श्री. लखमराजे खेम सावंत भोंसले आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे लखम सावंत भोंसले हे तितक्याच निष्ठेने पुढे चालवत आहेत.

या प्रकरणात सकारात्मक आणि महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठ, सर्व पक्षकार, वकील आणि शासकीय अधिकाऱ्यांचे सावंतवाडी राजघराण्याच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा