*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*देव महादेव*
वैदिक काळापूर्वी पृथ्वीवर दैत्य माजले होते. ते ऋषीमुनींना जप, तप, ऊपासना, तपश्चर्या, यज्ञ करू देत नसत.
विघ्न आणत. लढाई करत. यज्ञ ऊधळून लावत.
अशावेळी संख्येने व ताकदीने कमी असलेले ऋषीमुनी देव महादेव किंवा विष्णूदेवाची आराधना करत.
या सृष्टीचे निर्माते जरी ब्रम्हदेव असले तरी विष्णू व महादेव हेच पालनहार आहेत.
निर्मिलेली सृष्टी जपणे, वाढवणे, पोसणे, रक्षण करणे हे या पालनहार देवांचे कार्य नेमलेले होते.
ते प्रसन्न होऊन वरदान देत, व दैत्य, असूरांचा नाश होई.
त्यातही देव महादेव हा भोळा, साधा, चट्कन प्रसन्न होणारा आहे. तो सत्य व धर्म कधीही सोडत नाही व असत्य अधर्माचा नाश केल्याशिवाय रहात नाही.
म्हणुनच जे जे सत्य आहे, धर्माच्या बाजूचे आहे, त्याला शिवस्पर्श असतो.
“सत्यम् शिवम् सुंदरम्.”
जे जे सत्य व धर्मावर अवलंबुन आहे ते ते सुंदरच आहे, आणि तिथे शिवाचे वास्तव्य आहे.
त्यामुळे वैदिक काळापासुन या चट्कन प्रसन्न होणा-या महादेव शंकराची ऊपासना करायची पद्धत पडली. वैदिक भूमिका ही सत्य व धर्म यावर ऊभारलेली असल्याने हे शंकरदेव प्रसन्न होऊन वरदान देत.
स्वत:महादेव हे गायन वादन व नृत्य याचे अधिपती आहेत. नटेश्वरम्हणुन ते पुजले जातात.
या तीन कला व डमरू यावर ते स्वत:सुद्धा कलेची साधना करतात.
प्राचीन काळापासुन या कलांची साधना शिवमंदिरात करून किर्तीवंत होण्याची परंपरा दिसते.
दक्षिणेकडे आजही अनेक श्री. शंकराची मंदिरे, मोठ्या पिंडी, नंदी यासहित दिसतात. फार श्रद्धेने व पावित्र्याने महादेवाची आराधना करावी लागते. काक्षण पावित्र्य म्हणजेच साक्षात श्री. महादेव.
ऊत्तरेकडे कला, गायन वादन व नृत्य हे घरोघरी होते पण आराधना श्री. नटेश्वराचीच.
हिंदूस्थानी कला या शिव ऊपासनेतुनच निर्माण झाल्या.
त्यातुन अनेक कलाकार गुणवंत, किर्तीवंत झाले.
आज श्रावणी सोमवार !
त्या महादेवाला श्रद्धेने वंदन करूया.
पण अनाचार अराजक ,अन्याय व अधर्म माजला कि, हाच महादेव हाती डमरू घेऊन अक्षरश:तांडव नृत्य करून पृथ्वी हादरून सोडतो.
तिसरा नेत्र ऊघडून त्या सर्व अशुभांचा नाश करतो. भस्मच करून टाकतो.
गळ्यात फक्त सर्पमाळ, हाती डमरू, व त्रिशूल कमरेला व्याघ्रचर्म, सोबत नंदीमहाराज असा तो पशूधनाशी धर्माची सांगड घालतो.भूतदया शिकवतो.
शेतीशिवाय पोषण नाही. बैलांशिवाय शेती नाही व सर्प, बैल या मित्रांशिवाय शेताचे रक्षण नाही ही कृतज्ञता तो यातुन दाखवतो.
कोणतेही अलंकार तो घालत नाही. त्याला दूध दही आवडते म्हणजे पुन्हा गोमातेचा आदर.
आवडीने घातलेच तर फुलांचे अलंकार घालतो. नाश केला तर राक्षस मुंडकी गळ्यात घालतो.
सृष्टीला पाणी पुरवण्यासाठी तो कैलासावरच रहातो व माथी गंगा धारण करतो.
भाळी तेजासाठी चंद्र आहे.
ऋग्वेद, यजूर्ववेद व सामवेद या तीन वेदांचे प्रतिक म्हणुन महादेवांना बेलाचे त्रिदल फार प्रीय आहे.
देवी पार्वतीने हा देव साधा म्हणुनच वर म्हणुन वरला.
व आपणही अलंकार भरजरी वस्त्र न धारण करता शुभ्र फुलांचे अलंकार, बिल्वदले, व साधी शुभ्र वस्त्रे स्विकारली.
सर्व जीवांना तृप्त करून… पावित्र्य व श्रद्धेने केलेली पूजा स्विकारून आपल्या आवडीचे खुलभर दूध जरी अर्पण केले तरी हा देव प्रसन्न होऊन तृप्त होतो. त्याच्या आशीर्वादाचा गाभारा भरून वहातो.
आराधना शिवाची… ऊपासना सत्याची.
अनुराधा जोशी.
9820023605
