You are currently viewing निसर्गाची देणगी, आरोग्याची गुरुकिल्ली; १९ ऑगस्टला एडगावात रानभाजी महोत्सव

निसर्गाची देणगी, आरोग्याची गुरुकिल्ली; १९ ऑगस्टला एडगावात रानभाजी महोत्सव

रानभाजी प्रदर्शनासह पाककला स्पर्धेचे आयोजन; नागरिक, शेतकरी व महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन

वैभववाडी / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पुढाकाराने वैभववाडी तालुक्यातील एडगाव येथे पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन तसेच त्यांच्या पौष्टिकतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या या महोत्सवात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक व पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्याची गरज आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांना विविध रानभाज्यांची ओळख करून देणे, त्यांच्या पौष्टिकतेची माहिती देणे आणि या पारंपरिक वनसंपदेचे जतन करण्यासाठी प्रेरित करणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या महोत्सवाचे आयोजन कृषी विभाग वैभववाडी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वैभववाडी व उमेद वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तसेच तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती (आत्मा) वैभववाडी, तालुका कृषी अधिकारी वैभववाडी, उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली आणि प्रकल्प संचालक (आत्मा) सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभणार आहे.

बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रा.पं. एडगाव-वायंबोशी सभागृह, ता. वैभववाडी येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे प्रमुख आकर्षण रानभाजी प्रदर्शन आणि पाककला स्पर्धा हे आहे. या माध्यमातून स्थानिक महिला व शेतकऱ्यांच्या पाककला कौशल्याला व्यासपीठ मिळणार असून, रानभाज्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण पाककृती नागरिकांना पाहता व अनुभवता येणार आहेत.

रानभाज्यांचा महोत्सव हा केवळ प्रदर्शन किंवा स्पर्धेपुरता मर्यादित नसून, पारंपरिक ज्ञान व स्थानिक खाद्यसंस्कृतीच्या जतनासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्त्व आणि त्यांची वाढती मागणी लक्षात घेता, या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी व महिला बचत गटांना रानभाज्यांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासही मदत होऊ शकते.

वैभववाडी तालुक्यातील नागरिक, शेतकरी तसेच महिलांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा