राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवले; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबोली वनक्षेत्र विभागात कार्यरत असलेल्या एका २२ वर्षीय महिला वनरक्षकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण सावंतवाडी तालुक्यासह वन विभागात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आश्लेषा मांगले (वय २२, मूळ रा. कोल्हापूर) असे तिचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आश्लेषा हीने माडखोल येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत जीवन संपवल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला.
मृतदेह पुढील वैद्यकीय उत्तरिय तपासणीसाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
