You are currently viewing पिकलेल्या केसांचा अनुभव

पिकलेल्या केसांचा अनुभव

*लेखक ऋषिकेश कामत लिखित अप्रतिम लेख*

 

*पिकलेल्या केसांचा अनुभव* 

 

“आमचे केस असेच पिकलेले नाहीत…”

हे शब्द आपण अनेकदा ऐकतो. पण खरं सांगायचं तर या वाक्यात फक्त वय नसतं, अनुभव असतो. त्या पांढऱ्या केसांमागे आयुष्यभराचे चढ-उतार, चुका, संघर्ष, माणसं, नाती आणि असंख्य ठेचा दडलेल्या असतात. म्हणून एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडे फक्त “म्हातारा माणूस” म्हणून पाहणं आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं, ही आपली घोडचूक ठरते .

आपल्यासमोर अनुभवाचं एवढं मोठं भांडार असताना आपण त्याकडे पाठ फिरवतो आणि स्वतःच ठेचा खाऊन शिकण्याचा हट्ट करतो. खरं तर एखाद्याने आपल्याआधी तो रस्ता चालून पाहिला असेल, कुठे खड्डा आहे हे सांगितलं असेल, तर तो खड्डा टाळण्यात शहाणपण आहे की “मी स्वतः पडूनच बघतो” यात?

म्हणूनच मला साधारण साठ-सत्तर वर्षांच्या आजोबांशी मैत्री करायला आवडते. त्यांच्याशी गप्पा मारताना अनेकदा असं जाणवतं की आपण पुस्तकात वाचलेला एखादा धडा ते आयुष्य जगून आलेले आहेत. नुसते अनुभव ऐकून जर आपल्या काही ठेचा कमी होणार असतील, तर मग कुणाला एवढी खुमखुमी आहे की प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अंगावर घेऊनच शिकायची?

पण इथे एक गंमत आहे.

प्रत्येक पिकलेला केस अनुभवाचा खजिना असेलच असं नाही.

काही जेष्ठ माणसं आयुष्यभर त्रास सहन करतात आणि त्या त्रासातून एकच गोष्ट शिकतात—गप्प राहा. अन्याय झाला तरी गप्प बसा, चुकीचं घडलं तरी गप्प बसा, प्रश्न विचारू नका. कारण बोलल्यावर त्रास होतो, अडचणी येतात. त्यामुळे पुढच्या पिढीलाही तेच शिकवलं जातं—“सोडून दे, आपल्याला काय करायचंय?”

मग आपली निराशा होते.

आपण अपेक्षा करतो, “तुम्ही मोठे आहात, एवढं आयुष्य पाहिलं आहे, काहीतरी सांगा.” पण ते बोलत नाहीत. कारण त्यांना अनुभवाने शिकवलं असतं की सत्य बोललं तरी त्रास होतो आणि चुकीच्या गोष्टीविरुद्ध उभं राहिलं तरी त्रास होतो. त्यामुळे गप्प बसणं सुरक्षित आहे.

पण काही जेष्ठ माणसं याच्या अगदी उलट असतात.

ते सांगतात, “हो, मला त्रास झाला. लोकांनी विरोध केला. अडचणी आल्या. पण मी गप्प बसलो नाही. चुकीच्या गोष्टीविरुद्ध उभा राहिलो. लढलो.”

अशा माणसांच्या पिकलेल्या केसांमध्ये फक्त वय नसतं; तिथे धैर्य असतं. त्यांच्या अनुभवातून आपल्याला फक्त भूतकाळ कळत नाही, तर भविष्याची दिशा मिळते.

म्हणून ज्येष्ठ माणसाचं प्रत्येक म्हणणं मान्य करायचं असं नाही. पण ते ऐकायचं नक्की. कारण ऐकणं म्हणजे मान्य करणं नाही; ऐकणं म्हणजे अनुभवाला एक संधी देणं.

हुशार माणसं बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर देतात. कारण बोलताना आपण आपल्याला जे माहित आहे ते सांगतो; पण ऐकताना आपल्याला जे माहित नाही ते शिकायला मिळतं.

आणि आता खरी गोष्ट आपल्या तरुण पिढीची.

वय वाढणारच आहे. काळ पुढे जाणारच आहे. काही वर्षांनी आपलेही केस पांढरे होतील. तेव्हा आपल्या पिकलेल्या केसांचा अर्थ काय असेल?

“मी आयुष्यभर गप्प राहिलो म्हणून माझे केस पिकले…”

की,“मी प्रश्न विचारले, चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवला, पडलो, उठलो, लढलो आणि त्या सगळ्यातून शिकलो म्हणून माझे केस पिकले…”

केस पांढरे होणं आपल्या हातात नाही. पण ते पांढरे होईपर्यंत आपण कसं जगायचं, हे मात्र आपल्या हातात आहे.कारण शेवटी प्रत्येकाच्या केसाचा रंग बदलतो; पण प्रत्येकाच्या केसांमध्ये अनुभवाचा अर्थ सारखा नसतो.कुणाचे केस गप्प बसण्याने पिकतात, तर कुणाचे लढण्याने.

प्रश्न एवढाच आहे—आपले केस पिकतील तेव्हा त्यामागचा अनुभव काय असेल ?

 

✍️ ऋषिकेश कामत, रत्नागिरी

प्रतिक्रिया व्यक्त करा