You are currently viewing खांद्यावरचं दुःख आणि कवेतली वेदना

खांद्यावरचं दुःख आणि कवेतली वेदना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खांद्यावरचं दुःख आणि कवेतली वेदना*

 

दुःख कधी कधी इतकं उदास करतं की

वाटतं,त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून

दुःखाची तक्रार करावी आणि

मन मोकळं करून घ्यावं…

 

वेदनाही कधी कधी इतक्या

गहिवरून येतात की

वाटतं,तिच्या कवेत हळुवार शिरून

वेदनांचा परिपाठ वाचताना

मनापासून,खूप रडावं…

 

पण दुःख खांद्यावर आणि

वेदना कवेत गेली की

कोणाबद्दल काहीच बोलावंसं वाटत नाही;

कारण जिथे आधाराला खांदा आणि

कवेतली उब मिळते,

तिथेच दुःख आणि वेदना

हळूहळू शांत होतात…

 

सुखात तर कोणीही कुणाचा

हात हातात घेत नाही;

निदान दुःख-वेदना आहेत म्हणून

त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून

तिच्या उबदार कवेत

मन मोकळं करता येतं…

 

एकमेकांना एकमेकांत सामावून घेतलं ना,

तर दुःखाची आणि वेदनांची तीव्रता

जाणवतच नाही.

कारण त्याच्या खांद्यावर आणि

तिच्या कवेतच

खरं, निःशब्द प्रेम असतं…

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा