You are currently viewing स्त्री जीवनाचा हृद्य जीवनस्पर्श

स्त्री जीवनाचा हृद्य जीवनस्पर्श

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा कोरडे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रा. बी. एन. चौधरी यांनी केलेली काव्य-समीक्षा*

 

*मेंदीच्या पानावर कविता संग्रह….* 

*स्त्री जीवनाचा हृद्य जीवनस्पर्श :* प्रा. बी. एन.चौधरी

 

“””””””””””””””””””””””””””””””””””””””

स्त्रीमन हे अतिशय भावनाशील असते. आपल्या सभोवती असलेल्या घटकांशी, वस्तूंशी, भावनांशी, माणसांसी ते सहज जुळवून घेते. आपल्या हृदयात साठवून ठेवते. स्त्री मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात मेंदीच्या पानाने असंच आपलं हक्काचं स्थान निर्माण करून ठेवलेलं आहे. बालिका, युवती, तरुणी, नववधू, सुखी संसारात रमलेली स्त्री आणि या जगाचा निरोप घेणारी सौभाग्यवती स्त्री यांना मेंदीच्या पानाची सोबत सतत लाभत असते. त्यांना मेंदीची भुरळच पडलेली असते म्हणा ना.! मेहंदी जशी स्वतः दगडावर घुसळली जाते आणि हातावर लावली जाते, तसं तसा तिचा रंग खुलत जातो. स्वतः कष्ट सोसून, नष्ट होऊन दुसऱ्याला रंगणाऱ्या, आनंद देणाऱ्या या मेंदी सारखंच स्त्री जीवन नाही का ? स्त्री जीवनातही ही सारी स्थित्यंतरे घडतच असतात. म्हणूनच, स्त्रीला मेहंदी जवळची सखी वाटत असावी. हे सारे आठवण्याचं कारण असं की, आमच्या साहित्यभगिनी कवयित्री सौ शैलजा करोडे यांनी स्नेहादरे त्यांचा कवितासंग्रह “मेंदीच्या पानावर” आस्वादनासाठी घरपोच पाठवला होता. अनेक दिवसानंतर, तो नुकताच एका बैठकीत वाचून झाला आणि त्यांच्या कवितांबद्दल कविता शैलीबद्दल मनात ज्या भावना दाटून आल्या, त्यांचे हे शब्दरूप आहे. वयाची एकोणसत्तरी गाठूनही त्या अजूनही साहित्य क्षेत्रात कार्यप्रवण आहेत. यातून त्यांचा लेखनाप्रती असलेला दृढ विश्वास आणि त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येते. या कविता संग्रहात सतत स्री जीवनाचा एक हृद्य जीवनस्पर्श जाणवत राहतो. त्यांचे हे लेखनसातत्य नवोदितांना निश्चितच प्रेरणा देईल याची मला खात्री आहे.

‘मेंदीच्या पानावर’ हा कविता-संग्रह जीवनातील विविध अनुभव, नाती, निसर्ग, ग्रामीण संस्कृती, स्त्रीजीवन आणि माणुसकी यांचे भावपूर्ण दर्शन घडवणारा संग्रह आहे. संग्रहाच्या मुखपृष्ठावर दिसणाऱ्या विविध स्त्री-चेहऱ्यांच्या चित्रातून स्त्रीच्या अनेक रूपांची आणि तिच्या समृद्ध भावविश्वाची जाणीव होते आणि संग्रहाच्या अंतर्गाची कल्पना येते. संग्रहातील कविता वाचतांना कवयित्रीची निसर्गाशी, मातीशी, कुटुंबाशी आणि आपल्या संस्कृतीशी असलेली घट्ट नाळ स्पष्टपणे जाणवते. साध्या जीवनातील अनुभवांना काव्यरूप देऊन त्यामागील व्यापक जीवनमूल्ये अधोरेखित करणे, हे या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.

या संग्रहातील कवितांचे विषय वैविध्यपूर्ण आहेत. ‘नदीकाठी माझे गाव’ या कवितेत गाव, नदी, हिरवीगार शेती, रानावनातील स्वच्छंद जीवन आणि धार्मिक उत्सव यांचे सुंदर चित्रण आहे. गावातील मंदिर, शिवरात्रीची जत्रा आणि ‘सर्वधर्म समभाव, नांदे इथे माणुसकी’ या आशयातून ग्रामीण समाजातील एकोपा आणि माणुसकीचा संदेश व्यक्त होतो. गाव हे केवळ भौगोलिक ठिकाण नसून भावनिक आणि सांस्कृतिक अस्तित्व आहे, अशी भावना या कवितेतून व्यक्त होते.

‘बळी पिकवितो मोती’ ही कविता शेतकऱ्याच्या जीवनावर नेमका प्रकाश टाकते. ऊन-पाऊस सहन करून जमीन कसणारा शेतकरी, बैलजोडी, तिफण, कणीस आणि दाणे यांच्या प्रतिमांमधून त्याच्या कष्टाचे वास्तव त्या वाचकांसमोर मांडतात. शेतातून मिळणारे धान्य म्हणजे शेतकऱ्याच्या घामाचे मोती आहेत. त्यामुळे श्रमप्रतिष्ठा आणि अन्नदात्याविषयी कृतज्ञता हा या कवितेचा मुख्य आशय आहे.

आई-वडिलांविषयीच्या संग्रहातील कविता भावनिक बाजू अधिक प्रभावी करतात. ‘आईची माया’ या कवितेत आईचे प्रेम, संरक्षण, संस्कार आणि त्याग यांचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे. ‘जशी आभाळाची छाया’ ही उपमा आईच्या अमर्याद मायेचे प्रतीक ठरते. ‘बाप’ या कवितेत बाहेरून कठोर दिसणाऱ्या वडिलांच्या मनातील प्रेमळ आणि हळवे रूप व्यक्त होते. वडील हे केवळ कुटुंबाचे पालनकर्ते नसून मुलांचे मित्र, मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आहेत, असा आशय कवयित्रीने मांडला आहे. त्यांनी मांडलेले विचार हे आपल्या मनातीलच आहेत असा भास वाचकाला व्हावा इतक्या त्या चपखल आहेत.

‘स्त्री गणित आयुष्याचे’ ही कविता स्त्रीच्या कर्तृत्वाचा वेध घेते. घरातील नातेसंबंध, जबाबदाऱ्या, सुख-दुःख यांचा मेळ घालत स्त्री कुटुंबाला सांभाळते. त्यामुळे स्त्रीला कुटुंबाच्या केंद्रस्थानी ठेवणारा दृष्टिकोन या कवितेत दिसतो. ‘माहेरचा पारिजात’ आणि ‘पान मेंदीचे’ या कवितांमध्ये माहेरच्या आठवणी, प्रेम, विवाहसंस्कार आणि स्त्रीच्या भावविश्वाचे कोमल चित्रण आढळते. या कविता स्री वाचकाला आपल्या विविध वयोगटाची अनुभूती देतील. कवयित्रीची भाषाशैली सहज, साधी, ओघवती आणि भावस्पर्शी आहे. अवघड किंवा कृत्रिम शब्दांचा अतिरेक न करता दैनंदिन जीवनातील शब्दांचा वापर त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवांशी वाचकांची सहज नाळ जळेल. विशेषतः ग्रामीण जीवनाशी संबंधित शब्दांमुळे कवितांना अस्सल ग्रामीण गंध प्राप्त झाला आहे. ‘कुई कुई मोट चाले’, ‘पिकामध्ये खेळे पाणी’, ‘तिफणीची गोटमार’, ‘दाणा भरता कणीस’ यांसारखे शब्दप्रयोग ग्रामीण जीवनाचे जिवंत चित्र उभे करतात.

कवितेतील लय साधी आणि गेय आहे. अष्टाक्षरीच्या जवळ जाणाऱ्या या कविता सहजपणे वाचता किंवा म्हणता येतात. विषयानुसार भाषेचा भावनिक सूरही बदलतो. आई-वडिलांवरील कवितांत वात्सल्य आणि हळवेपणा, गावावरील कवितेत निसर्गरम्यता, शेतकऱ्यावरील कवितेत कष्टाचे वास्तव आणि स्त्रीविषयक कवितेत आत्मीयता जाणवते. कवयित्रीने उपमा, रूपक, अनुप्रास, पुनरुक्ती यांसारख्या अलंकारांचा सहज वापर केला आहे. ‘आईची माया आकाशाची छाया’ या आशयातून उपमेचा सुंदर प्रत्यय येतो. ‘बळी पिकवितो मोती’ या शीर्षकातच रूपकाचा प्रभाव दिसतो. शेतातील धान्याला मोती म्हटल्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टाचे मोल अधोरेखित होते.

नदी, माती, हिरवीगार शेते, कणीस, बैलजोडी, पारिजात, मेंदी आणि आभाळाची छाया या संग्रहातील महत्त्वाच्या प्रतिमा व प्रतीके आहेत. नदी जीवनाच्या प्रवाहाचे, माती श्रम आणि मातृत्वाचे, कणीस समृद्धीचे, तर बैलजोडी शेतकऱ्याच्या कष्टाचे प्रतीक आहे. पारिजात माहेरच्या प्रेमळ आठवणींचे प्रतीक बनतो. ‘मेंदी’ हे या संग्रहाचे मध्यवर्ती प्रतीक बनले आहे. ती स्त्रीचे त्याग, समर्पण, सौंदर्य, प्रेम, विवाहसंस्कार, नाते आणि आठवणी यांचे प्रतीक आहे. या संग्रहातून कवयित्रीने निसर्गाशी, मातीशी आणि आपल्या माणसांशी नाते जपण्याचा संदेश दिला आहे. शेतकऱ्याच्या श्रमांचा आदर करावा, आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवावी आणि स्त्रीच्या कर्तृत्वाचा सन्मान करावा, असे विविध भाव कवितांतून सूचित होतात. त्याचबरोबर सर्वधर्मसमभाव, माणुसकी, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक एकोपा यांनाही कवयित्रीने महत्त्व दिले आहे. जी काळाची आजची खरी गरज आहे.

‘मेंदीच्या पानावर’ हा संग्रह ग्रामीण जीवनाच्या मातीत रुजलेला आणि नात्यांच्या ऊबेत फुललेला काव्यसंग्रह आहे. निसर्गप्रेम, श्रमप्रतिष्ठा, आई-वडिलांविषयी कृतज्ञता, स्त्रीचे कर्तृत्व, माहेरच्या आठवणी आणि माणुसकीची मूल्ये यांचा सुंदर संगम या कवितांत दिसतो. साधी-सोपी भाषा, जिवंत प्रतिमा, अर्थपूर्ण प्रतीके आणि भावपूर्ण मांडणी ही संग्रहाची बलस्थाने आहेत. कवयित्रीने मोठ्या तात्त्विक विधानांपेक्षा सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातून जीवनाचे सौंदर्य शोधले आहे. त्यामुळे ‘मेंदीच्या पानावर’ हा संग्रह वाचकाच्या मनावर केवळ शब्दांची नव्हे, तर मातीचा गंध, नात्यांची ऊब आणि माणुसकीची सुंदर मेंदी उमटवतो.

कवयित्री यांचे यापूर्वी १० कथासंग्रह, ४ कवितासंग्रह, २ चारोळी संग्रह, १ भक्ती गीत संग्रह, ४ कादंबऱ्या, १ ललित लेख संग्रह असे विपूल साहित्य प्रकाशित आहे. अनेक शासकीय पुरस्कारांनी त्या सन्मानीत आहेत. अंबाडी जिल्हा ठाणे येथील “रंगतदार” प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या प्रस्तुत कवितासंग्रहाला विजय जोगमार्गे यांचे साजेसे कलात्मक मुखपृष्ठ आहे. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर यशवंत शंकर राऊत यांनी संग्रहाला समर्पक अशी प्रस्तावना दिली असून कवयित्री शैलजा करोडे यांनी आपल्या मनोगतात कविता रुपी संजीवनी मुळेच मी जीवनातील सुखदुःख, संकट पार करत आले आहे, असे कवितेला श्रेय देऊन कविता आयुष्यभर माझ्या सोबत आहे आणि ती माझ्या जगण्याचा आनंद वाढवते ! अशी सकारात्मक भूमिका मांडलेली आहे. ९९ पृष्ठसंख्या असलेल्या या कवितासंग्रहात स्त्री जीवनातील विविध विषयाला हात घालणाऱ्या एकूण ८८ कविता असून कवितासंग्रहाची किंमत २१० रुपये आहेत. स्त्री मनातील भावना जाणून घेणाऱ्या रसिक वाचकाने हा संग्रह वाचावा ही अपेक्षा. शैलजाताई करोडे (९७६४८०८३९१) यांना त्यांच्या पुढील साहित्य लेखनासाठी आभाळभर शुभेच्छा.!

 

© *प्रा. बी एन चौधरी.*

देवरूप, नेताजी मार्ग.

धरणगाव, जि. जळगाव.

४२५१०५.

(९४२३४९२५९३)

प्रतिक्रिया व्यक्त करा