You are currently viewing लावणीतील हिरा हरपला, घुंगरू मुके झाले

लावणीतील हिरा हरपला, घुंगरू मुके झाले

पुणे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शकुंतला नगरकर उर्फ ‘शकूताई’ यांचे वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने लावणी, लोककला आणि मराठी सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे.

शकूताई यांनी पाच दशकांहून अधिक काळ लावणी नृत्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण आणि अग्रणी योगदान दिले. २००८ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार व सन्मान मिळाले होते.

पुणे, सोलापूर आणि बेळगावसह विविध ठिकाणी त्यांनी तब्बल ३५ वर्षे स्वतःचा नृत्य-संच चालवला. अनेक तरुणींना नृत्य, गायन आणि सादरीकरण कलेचे प्रशिक्षण देत त्यांनी लावणीची परंपरा पुढे नेली.

त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वाने एक अष्टपैलू आणि ज्येष्ठ कलावंत गमावला आहे.

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी आणि ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित शकुंतलाबाई नगरकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या असामान्य प्रतिभेने आणि समर्पणाने त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध लावणी परंपरेला नवी ओळख मिळवून दिली.

बैठकीची लावणी, भावमुद्रा, अदाकारी आणि नजाकतीचा अनोखा संगम त्यांच्या कलेत पाहायला मिळत असे. ‘संगीत बारी’सारख्या प्रयोगांतून त्यांनी अस्सल लावणीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

शकुंतलाबाई नगरकर यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीय, आप्तस्वकीय व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

प्रतिक्रिया व्यक्त करा