*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पागोळी…*
रिमझिम रिमझिम धारा झरती
चराचराला मोहून जाती..
अलगद आडोसा तो शोधून
पक्षी प्राणी बिलगून बसती!…१
धुंद दिशा अन् धुंदची वारा
फुलवित येई मोरपिसारा ओलावलेल्या हिरव्या रानी
सुगंध फुलांचा मिरवित सारा…२
वर्षा ऋतु करी बेभान मनाला
ग्रीष्म तापल्या तप्त धरेला
ऊन झळा त्या शीतल होऊनी
अंगो पांगी करी शांत जीवाला…३
जसा थांबतो पाऊस वारा
चहू दिशा होतात मोकळ्या
पण छपरावरून ओघळती
थेंबा थेंबातून पागोळ्या..४
टप् टप् ध्वनी तो कानी येई
पिंगा घालीत घुमतची जाई
फुलपाखरासम घालीत रुंजी
मनास माझ्या भुलवित राही..५
असे वाटते घडतच जाते
छोटे मोठे मनामनातून
तरी पण काही झिरपत राहते
‘पागोळी’सम आतून आतून…..
उज्ज्वला सहस्त्रबुद्धे, पुणे
