*शिक्षक दिनानिमित्त पिंपरी – चिंचवडमध्ये रंगले शिक्षक कविसंमेलन; काव्यमयी वातावरणात शिक्षकांच्या प्रतिभेचा जागर!*
पिंपरी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले ‘शिक्षक कविसंमेलन’ अत्यंत उत्साहात आणि काव्यमयी वातावरणात संपन्न झाले. कवयित्री शान्ता शेळके सभागृह, संत तुकाराम संकुल, निगडी प्राधिकरण येथे संपन्न झालेल्या या संमेलनात विविध शाळा – महाविद्यालयांतील शिक्षक कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करत साहित्यरसिकांची मने जिंकली.कार्यक्रमाला महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, कार्यवाह डाॅ. संजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कविसंमेलनात कवी अशोक सोनवणे, प्रतिमा काळे, प्रा. महादेव रोकडे, जयश्री श्रीखंडे, अनुप्रिया प्रभू, ऐश्वर्या गर्जे, श्रावणी फुलझलके आदी कवींनी शिक्षणपद्धती, निसर्ग, सामाजिक वास्तव, मातृत्व आणि शिक्षक जीवनातील विविध अनुभवांवर आधारित कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. काही रचनांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले, तर काही हास्यकवितांनी सभागृहात खसखस पिकवली. रसिकांनी प्रत्येक कवितेला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
याप्रसंगी डाॅ. पांडुरंग भोसले यांनी समाजात आणि शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या योगदानाचे विविध दाखले देत भारतीय संस्कृतीत शिक्षकांचे योगदान उत्युच्च असल्याचे प्रतिपादन केले; तर महेंद्र भारती यांनी आपल्या मनोगतातून ब्रिटिश काळापासून सुरू झालेली औपचारिक शिक्षणाची पद्धत आणि लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, आगरकर, गोखले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शाहूमहाराज, भांडारकर, डाॅ. राधाकृष्णन, कर्मवीर भाऊराव पाटील अशा भारतीय विचारवंतांनी आणि शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी समाजाला घडविण्यात दिलेले योगदान याविषयी सविस्तर ऊहापोह करून तळागाळातील माणूस शिक्षणाच्या माध्यमातून केंद्रस्थानी यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. मसाप पिंपरी – चिंचवड शाखेच्या कार्यकारिणीने संयोजन केले. जालिंदर राऊत यांनी सूत्रसंचालन केले. संजय जगताप यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
