श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ
श्री पंचम खेमराज महाविद्यालयात गुरुवारी संयुक्त कार्यक्रम; जन्मशताब्दी वर्षाच्या बोधचिन्हाचे होणार अनावरण
सावंतवाडी :
श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) येथे संस्थापक दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक लेफ्ट. कर्नल हि. हा. श्रीमंत शिवरामराजे भोंसले (राजेसाहेब) यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा संयुक्त कार्यक्रम गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जन्मशताब्दी वर्षाचा औपचारिक शुभारंभ तसेच जन्मशताब्दी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले (राजाबहाद्दूर) भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रविंद्र कुलकर्णी, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ उपस्थित राहणार आहेत.
श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेले योगदान आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या उभारणीत बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांचे स्मरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास हि. हा. श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोंसले (राणीसाहेब), युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले, चेअरमन व कार्यकारी विश्वस्त, युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले, विश्वस्त व नगराध्यक्षा सावंतवाडी नगरपरिषद, तसेच संस्थेचे नियामक मंडळ सदस्य, सर्व सभासद आणि प्राचार्य उपस्थित राहणार आहेत.
या ऐतिहासिक व गौरवपूर्ण कार्यक्रमास नागरिक, माजी विद्यार्थी, विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शिक्षणप्रेमींनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
