पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह माजी सैनिकांचा सहभाग; ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमले शहर
सावंतवाडी : भाजपच्या माध्यमातून शहरात करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ रॅलीला आज सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी “वंदे मातरम्…!, भारत माता की जय…!” अशा घोषणांनी परिसर निनादून गेला. या तिरंगा रॅलीचे नेतृत्व पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह माजी सैनिकांच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. भाजप युवा नेते विशाल परब व रॅलीचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या पुढाकारातून या रॅलीचे यशस्वी नियोजन करण्यात आले.
येथील उपरलकर देवस्थान येथून या यात्रेला सुरुवात झाली. हातात फडकणारा तिरंगा आणि भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण सावंतवाडी शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, तिरंगा हा आपल्या अस्मितेचा विषय असून देशावर प्रेम करणे आणि ‘वंदे मातरम्’ म्हणणे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे. “भारत माता की जय…!” न म्हणणाऱ्यांवर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. तसेच अशा लोकांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे आणि संबंधित संस्थांची नोंदणी रद्द केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्यासाठी पक्षापेक्षा राष्ट्र प्रथम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या संस्कृतीचा उल्लेख करत देशप्रेम आणि विकासासाठी सर्वजण पक्षभेद विसरून एकत्र आल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे देशामध्ये एकतेची भावना निर्माण झाली असून महाराष्ट्राची शान म्हणून भारताचा उदय होत असताना प्रत्येकाने भारतमातेला वंदन केले पाहिजे, असे ते म्हणाले.
भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी या यशस्वी यात्रेचे श्रेय माजी सैनिक आणि जनतेला दिले. जिल्ह्यात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात असून देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनीही प्रत्येक मतदारसंघात अशा यात्रांचे आयोजन करून ‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष लखमराजे भोसले, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, सुदन कवठणकर, विक्रांत सावंत, मायकेल डिसोजा, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, उपाध्यक्ष गौरव मुळीक, नगरसेविका मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, निलम नाईक, दुलारी राणगेकर, स्नेहा नाईक, प्रतिक बांदेकर, दिलीप भालेकर, सुकन्या टोपले, संतोष राऊळ, सागर ढोकरे, महेश सारंग, जावेद खतिब, प्रसन्न देसाई यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच माजी सैनिक आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
