You are currently viewing पाणीपुरी

पाणीपुरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री राधा गर्दे लिखित अप्रतिम लेख*

 

*पाणीपुरी*

 

मी गोल आहे खरी पण नितळ कांती असलेली. प्रत्येक रसिक माझ्याकडे बघताच माझ्यावर अनुरक्त होतो. अनेक भागात अनेक नावाने ओळख असलेली.( पाणीपुरी, पानी के बतासे, गोलगप्पे, पुचके) पण

“नावात काय ठेवलंय ?”

खरंच आहे. मी नितळ कांतीची. जेव्हा माझा श्रृंगार होतो तेव्हा मी “नमकीन” होते. म्हणजे आणखीच …इश्श्श्श् ….

माझ्यात धवल बटाटे, नाहीतर कंच मटर भरून जेव्हा माझा स्नानविधी करण्यास, जिरं, काळं मीठ,पोदीना, चिंच,सौंफ, तिखट, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्या सुवासिक वस्तू घालून जल तयार करून मला त्यात सोडून लगेच अलगद हाताने बाहेर आणतात तेव्हा सुस्नात मी अधिकच सुंदर होते आणि एका पात्रात ठेवून मला पुढे करताच माणसं अक्षरशः वेडावून जातात. काय रांग असते माझ्यासाठी?

तुम्हाला म्हणून सांगते कानपूरला ना २५ काचेच्या पात्रां मधे माझ्या साठी वेगवेगळे सुगंधित आणि चविष्ट जल तयार करतात आणि मग त्यातून मी कोणत्या जलात न्हाऊन निघायचे हे समोरचा माणूस ठरवितो. कधी कधी तर व्यक्ती,पंचवीस पात्रांचे जल चाखल्या नंतरच ठरवतो मी त्याला कशी हवी ते.आहे ना गंमत? म्हणजे ह्यांच्या पोटात माझ्या साठी किती माया असावी नाही का?

 

आता तुम्हाला आणखी एक गंमत सांगते. ह्या जगात सगळेच माझे चाहते आहेत असं नाही हं. काही माझ्याशी जळणारे ही आहेत हं. कोण? आश्चर्य वाटलं ना ? ऐका.

तो एका परातीत गाल फुगवून बसलेला दही वडा दिसतोय ना? तो बोलत नाही पण तो जळतो आणि हो तो बघा लांबट चेहरा करून बसलेला समोसा तो ही त्यातलाच. आणि तो बघा तो.. तो रागाने लालपिवळा झालेला आलूवडा ..हे सगळे माझ्याशी जळतात. कारण ? अहो! हे सगळे सगळ्यांचे प्रिय जरी असले तरी शेवटी काय ? जो पर्यंत माझ्याकडे सगळे मोर्चा वळवत नाही तो पर्यंत मनाला तृप्ती नसते ना? आणि मला हातात घेताच एक हाताने द्रोण धरत दुसऱ्या हाताने मोठ्ठा आ वासून ते मला प्रेमाने जवळ घेताना ओठांवर अलगद हात ठेवत, डोळ्यात पूर्ण आनंदाचे भाव उजळतात बस हेच तर जळण्याचे कारण. आम्ही काहीही केलं तरी हीच सगळ्यांची लाडकी. हिच्या शिवाय ‘चाट हा प्रकार व्यर्थ’ हेच ऐकायला मिळतं. हेच ह्या सगळ्यांच्या दु:खाचे कारण.

 

कॉलेज कन्या हसत खिदळत मला नाजुक आणि लडिवाळपणे हाताळतात, तरुण मुलं मी जवळ असताना कुठेच लक्ष देत नाहीत, आबाल वृद्ध सगळ्यांची लाडकी. दात नसले तरी हळुवार पणे मला तोंडात रेंगाळत ठेवून माझा पूर्ण लुत्फ घेतात. एकंदरीत काय मी “चाट की रानी.”

 

आता ह्यात माझा काय दोष? सांगा ना.

एक आणखी सांगू का? मी जरी अशी छोटीशी वाटत असले ना? तरी माझे बरेच मालक करोडपती आहेत माझ्या मुळे. बस ते दाखवत नाहीत तसं. किती इन्कमटॅक्स भरावा लागतो त्यांना हे कळलं ना तर तुमचे डोळे पांढरे होतील.

 

पण कोणीतरी माझ्यासाठी एक फारच फसणारा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. काय? अहो चक्क बासुंदीत माझ्या सुंदर देह भिजवण्याचा कट रचला होता बरं झालं बाई सगळ्यांनी तो कट सपशेल उधळून लावला. त्यासाठी मी आभारी आहे हो तुमची.

तर अशी मी….पा….🫣

 

 

राधा गर्दे

कोल्हापूर

प्रतिक्रिया व्यक्त करा