*३४८ विविध वैद्यकीय तपासण्या; १४ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया ; तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्यसेवा*
सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत झालेल्या या शिबिराचा ६२३ रुग्णांनी लाभ घेतला, तर विविध प्रकारच्या ३४८ वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय १४ रुग्णांवर आय सर्जरी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य दिपलक्ष्मी पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबिद नाईक, सरचिटणीस सावळाराम अणावकर गुरुजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, उपअधिष्ठाता डॉ. श्रेयस बुरुटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. स्वप्नील मालखेडे यांच्यासह डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, रुग्ण व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी शिबिराची माहिती दिली. छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथील अतिविशेषोपचार तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरासाठी उपलब्ध झाले होते. कार्डिओलॉजिस्टमार्फत हृदयाची 2D इको तपासणी तसेच विविध अतिविशेष उपचार व तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आबिद नाईक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गची दिवसेंदिवस प्रगती होत असून जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी अन्यत्र पाठविण्याची आवश्यकता कमी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणारे मेगा आरोग्य तपासणी शिबिर हे अत्यंत स्तुत्य व रुग्णसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
*तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा*
शिबिरासाठी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. भूपेंद्र पाटील (कार्डिअॅक सर्जन), डॉ. तृप्ती पवार (न्यूरोसर्जन), डॉ. रणजीत पाटील (प्लास्टिक सर्जन), डॉ. अजित हंगे व डॉ. सम्यक भिवगडे (कार्डिओलॉजिस्ट) उपस्थित होते. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गचे डॉ. सागर कोल्हे (युरोलॉजिस्ट) आणि एस.एस.पी.एम. वैद्यकीय महाविद्यालय, पडवे येथील डॉ. विनायक कांबळे (ऑन्को सर्जन) यांनीही रुग्णांची तपासणी केली.
कार्डिओलॉजी, कार्डिअॅक सर्जरी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, ऑन्को सर्जरी, युरोसर्जरी, जनरल सर्जरी, अस्थिरोग, नेत्ररोग, दंत, हृदयरोग व मधुमेह, फुफ्फुसरोग, मानसोपचार, बालरोग व स्त्रीरोग अशा विविध विभागांतील तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
*६२३ रुग्णांनी घेतला लाभ*
शिबिरात मेडिसिन विभागातील १३६, फुफ्फुसरोग २१, बालरोग ४१, त्वचारोग १८, मानसोपचार २८, सर्जरी ६६, अस्थिरोग ५३, नेत्रचिकित्सा ४८, कान-नाक-घसा २७, स्त्रीरोग १९, दंतशास्त्र २०, कार्डिओलॉजी ५७, कार्डिअॅक सर्जरी ५७, युरोसर्जरी २७, न्यूरोसर्जरी ३, प्लास्टिक सर्जरी १ आणि ऑन्को सर्जरी १ अशा एकूण ६२३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
*३४८ विविध तपासण्या*
शिबिरात १३३ एक्स-रे, ४७ सोनोग्राफी, १९ सिटी स्कॅन, ४१ हृदयाच्या 2D इको तपासण्या आणि १०८ रक्त तपासण्या, अशा एकूण ३४८ तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय शालेय मुलांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
शिबिर स्थळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कार्ड, वय वंदना कार्ड आणि आभा (ABHA) कार्ड यांची नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिरामध्ये एकूण १४ रुग्णांवर आय सर्जरी करण्यात आली. तसेच जनरल सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी आणि स्त्रीरोग विभागातील गर्भाशय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) श्री. नितीन तुरनर यांनी केले.
