*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मेघा अविनाश कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*
अद्वैत कुसरी
आपण कधी म्हणत नाही हे ग्रह तारे मी आहे, हे आकाश मी आहे, हा डोंगर मी, हा समुद्र मी… कारण?..कारण अंतर. हे सगळे आपल्यापासून दूर असतात. म्हणून ते आपण नाही.
पण हे शरीर मी असं मात्र पक्कं धरून चालतो. कारण?.. कारण अंतर. या सगळ्या पसाऱ्यातला, पसाऱ्याचा, आपल्याला जाणवणारा सगळ्यात जवळचा तुकडा म्हणजे हे शरीर. वास्तविक जसा तो डोंगर आपण नाही, तसंच हे शरीरही आपण नाही. ते आपलंही नाही. त्या पसाऱ्याचं आहे. क्षणा क्षणाला संपत जाणारं… कुठल्याही इंद्रियावर आपला ताबा नसलेलं… आपलं असतं तर त्याने आपलं ऐकलं असतं. आपल्याला सोडून गेलं नसतं ते.
किती तरी क्रिया शरीरात चालू असतात. श्वसन, पचन, हृदयाचं धडधडणं. आपल्याकडे त्यांचं कर्तेपण नसतं. आपल्या मर्जीने ते चालत नाही. समष्टी शक्ती ते घडवत असते. इतरही कितीतरी क्रिया आपण करतो असं वाटतं आपल्याला. मी बोलते, मी चालते, मी जेवते…याचं कर्तेपण पण वास्तविक आपल्याकडे, व्यष्टीकडे नसते. त्यामागे पण समष्टीशक्तीच असते.
निसर्गातही पूर येणे, भूकंप होणे, उल्कापात होणे हे सगळं चालूच असतं. समष्टीशक्तीने सगळं होत असतं. व्यष्टीच्या हातात ना ते घडवणं असतं ना ते रोखणं.
माणूस समजतोय स्वतःला समष्टीपेक्षा वेगळं. म्हणून त्याला स्वतःच्या शरीरावर वाढणाऱ्या ९०% जीवजंतूंचं, शरीरातल्या पेशींचं, आपल्याच शरीरात वसाहत करून असणाऱ्या जीवांचं अप्रूप. जो स्वतः त्या समष्टी शरीरावरचा एक क्षुद्र जंतू आहे त्याचं ९० च काय १००% स्वतःचं काहीही नाहीय.
या गोष्टीची जाणीव विचार पातळीवर होतेही बऱ्याचदा. पण आचार पातळीवर याचा विसर पडतो. या भावनेवर कायम राहता येणं कठीण असतं. कौशल्याचं असतं.
म्हणून तर माऊलीने या भावनेवर कायम राहण्याला सुरेख नाव दिलंय. कुसर..कुसर म्हणतात ते त्या भावनेला.
अद्वैत कुसरी विरळा जाणे…
मेघा अविनाश कुळकर्णी
अंबरनाथ
