You are currently viewing केंद्रशाळा पिंगुळी नं १ येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा उत्साहात शुभारंभ

केंद्रशाळा पिंगुळी नं १ येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा उत्साहात शुभारंभ

केंद्रशाळा पिंगुळी नं १ येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा उत्साहात शुभारंभ*

गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिष्यवृत्ती यशासाठी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन*

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा पिंगुळी नं १ येथे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करावे, या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या संकल्पनेतून या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाराम सडवेलकर (जिल्हा परिषद सदस्य, पिंगुळी) हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून वासुदेव मराठे (सेवानिवृत्त केंद्रप्रमुख) तसेच मा. श्री. प्रशांत धोंड (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाची योग्य दिशा, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक पिंगुळी नं १ केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश नाईक यांनी केले. वासुदेव मराठे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित अध्ययन, स्व-अभ्यास, लेखन सराव आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून यश मिळवावे, असे आवाहन केले. तर प्रशांत धोंड यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासून प्रत्येक विषय संकल्पनात्मक पद्धतीने समजून घेतल्यास शिष्यवृत्ती परीक्षेत निश्चित यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात गंगाराम सडवेलकर यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत यश मिळविणे हेच अंतिम ध्येय नसून उत्तम व्यक्तिमत्त्व घडविणे, ज्ञानाची आवड जोपासणे आणि स्पर्धात्मक युगात स्वतःला सक्षम बनविणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणारी असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी त्यांनी आयोजक शिक्षकांचे विशेष कौतुक केले.

यावेळी केंद्रशाळा पिंगुळी नं. १ केंद्रप्रमुख गणेश नाईक, केंद्रशाळा तेर्सेबाबर्डे नं १ चे केंद्रप्रमुख महेश परुळेकर, दोन्ही केंद्रांतील सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या मार्गदर्शन वर्गामध्ये महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांकडून विषयनिहाय मार्गदर्शन, सराव चाचण्या, प्रश्नपत्रिका विश्लेषण, अभ्यास नियोजन तसेच शंका निरसन यांचा लाभ मिळणार असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक राजाराम कविटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रमुख्याध्यापक स्वरा काळसेकर यांनी केले. या उपक्रमाचा फायदा पिंगुळी केंद्रातील आठ, तेरसेबांबर्डे केंद्रातील तीन शाळांमधील इयत्ता चौथीच्या ५१ तर सातवीच्या २३ विद्यार्थ्यांना होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन पिंगुळी केंद्रामधील शिक्षकवृंदांनी केले. उपस्थित सर्व मान्यवर, पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत हा मार्गदर्शन वर्ग विद्यार्थ्यांच्या यशाचा मजबूत पाया ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा