आयुष्मान भारत–महात्मा फुले आरोग्य योजनेचे कार्ड प्रत्येक कुटुंबाने काढावे; नागरिकांना राजू मसूरकर यांचे आवाहन
आरोग्य कार्ड नसल्यास मोफत उपचारांचा लाभ मिळू शकत नाही; जिल्हाभर जनजागृती मोहीम सुरू असल्याची माहिती
सावंतवाडी
प्रधानमंत्री आयुष्मान भारत–महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाने आपले आरोग्य कार्ड तातडीने काढावे, असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा सुवर्ण-रौप्य व्यावसायिक राजू मसूरकर यांनी केले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ मिळतो. तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोवंदना योजनेअंतर्गत अधिक लाभ उपलब्ध आहेत. मात्र अनेक नागरिकांनी अद्याप आयुष्मान कार्ड काढले नसल्याने गरजेच्या वेळी उपचारांसाठी आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
राजू मसूरकर यांनी सांगितले की, राज्यातील विविध शासकीय व मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये हजारो प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार या योजनेतून उपलब्ध आहेत. पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व आवश्यक कागदपत्रांसह ई-सेवा केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन आयुष्मान कार्ड काढावे.
यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरे, चर्च, मशिदी तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना या योजनेची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजू मसूरकर यांनी आपल्या निवेदनात दावा केला की, २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन तत्कालीन राजीव गांधी जीवनदायी जनआरोग्य योजना राज्यभर विस्तारण्याची मागणी केली होती. पुढील काळात या योजनेचा विस्तार झाला असून सध्या ती प्रधानमंत्री आयुष्मान भारत–महात्मा फुले जनआरोग्य योजना या नावाने राबविण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेली २६ वर्षे आपण गरजू रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असून कोणताही भेदभाव न करता रुग्णसेवा करणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाने स्वतःचे आणि कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान कार्ड काढून शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
