You are currently viewing १५ ऑगस्टपूर्वी मालवणातील नादुरुस्त रस्त्यांचे डांबरीकरण करा; अन्यथा आंदोलन – सुरेश बापर्डेकर

१५ ऑगस्टपूर्वी मालवणातील नादुरुस्त रस्त्यांचे डांबरीकरण करा; अन्यथा आंदोलन – सुरेश बापर्डेकर

नगर परिषद प्रशासनाला इशारा; दर्जेदार कामाची मागणी, नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

मालवण / प्रतिनिधी :

मालवण नगर परिषद हद्दीतील अनेक प्रमुख रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाल्याने नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील सर्व खराब रस्त्यांचे १५ ऑगस्टपूर्वी दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा मालवण नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जागरूक नागरिक सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भरड नाका–रांगोळी महाराज, रांगोळी महाराज–वाघ पिंपळ तसेच तानाजी नाका–आंबा नाका हे शहरातील प्रमुख रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. तानाजी नाका ते आंबा नाका हा रस्ता सातत्याने पाठपुरावा करून तयार करण्यात आला होता. मात्र, गेल्या वर्षापासून हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला असून प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या विभागाची जबाबदारी वर्षभर उलटूनही समजलेली नाही. दोन महिन्यांपूर्वी स्वतः अधिकाऱ्यांसमवेत रस्त्यांची पाहणी करून खड्डे दाखवूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासन जास्त पाऊस आणि गणेशोत्सव संपण्याची वाट पाहत आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नगर परिषद प्रशासनाने केवळ वरवरची मलमपट्टी न करता दर्जेदार व टिकाऊ डांबरीकरण करावे. निकृष्ट दर्जाची कामे करून नागरिकांची दिशाभूल करू नये. अशा कामांमुळे काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले.

विशेषतः वाघ पिंपळ परिसरातील गतिरोधकाजवळ मोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

नगर परिषद प्रशासनाने १५ ऑगस्टपूर्वी शहरातील सर्व नादुरुस्त रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण करावे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता नागरिकांसह मालवण नगर परिषद कार्यालयासमोर अथवा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुरेश बापर्डेकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा