*जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य गझलसम्राट गझलगुरु प्रा.डॉ. रे. भ. भारस्वाडकर लिखित गझलसंग्रह “गझलब्रम्ह” चे साहित्यिका शोभा वागळे यांनी केलेलं परीक्षण*
*गझल ब्रह्म (परीक्षण)*
प्रा. डॉ. रे. भ. भारस्वाडकर सरांचा ‘गझल ब्रह्म’ हा पहिलाच गझल संग्रह, १७/५/२०२६ रोजी, संभाजी नगर येथे प्रकाशित करण्यात आला. सरांनी आवर्जून मला तो पुण्याला पाठवला. गझल संग्रहाचे मुखपृष्ठ आणि शीर्षक मला खूप भावले.
‘अहं ब्रह्मास्मि’ या प्रमाणेच ‘गझल’ ही काव्य रचना कवितांची सम्राज्ञीच म्हणायला हवी. गझल रचना ही संपूर्ण काव्य रचनेत सर्वोच्च मानली जाते. एकाच गझलेत विविध खयाल घेऊन असंख्य शेरांची एकच गझलही लिहिणाऱ्यास लिहिता येत असते.
गझल सम्राट आ. सुरेश भट साहेबांच्या सहवासाचा आनंद घेतलेले, तसेच ७३ गझलकारांचा पहिल्या प्रातिनिधिक गझल संग्रह “काफला” यात डॉ.भारस्वाडकर सरांच्या दोन गझलाही समाविष्ट केलेल्या आहेत.
डॉ. भारस्वाडकर सरांना दोन महान गुरूचे मार्गदर्शन लाभले, ते म्हणजे आ. डॉ. गुलाम रसूल सर आणि गझल सम्राट आ. सुरेश भट साहेब. अशा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांची गझल हळू हळू अधिकाधिक फुलत गेली. पाच दशकांहून अधिक काळ गझलेच्या क्षेत्रात असून
गझल क्षेत्रात मौलाची कामगिरी करत आहेत.
‘शब-ए-गझल’ या सोलो संगीतबद्ध ऑडिओ कॅसेटमुळे त्यांचे नावलौकिक झाले आणि त्यांचा चाहता वर्गही खूप वाढला. आज सुद्धा डॉ. भारस्वाडकर सर गझल क्षेत्रात अलौकिक कामगिरी करत आहेत. सध्या त्यांची त्रेपन्नावी ऑनलाईन गझल कार्यशाळा सुरू आहे. ह्या उपक्रमातून त्यांनी नि:शुल्क सेवा देऊन असंख्य गझलकार तयार केलेत आणि करत आहेत.
ह्या संग्रहास ज्येष्ठ समीक्षक व गझलकार बदीउज्जमा बिराजदार (साबिर सोलापूरी) ह्यांनी सुंदर संक्षिप्त प्रस्तावना दिलेली आहे.
तसेच पाठराखण गझलकार, दीवानकार आणि ‘बाजीगर’ प्रकाशनचे संस्थापक, सिराज करीम शिकलगार सर ह्यांनी दिली आहे. यात प्रा. डॉ. रे. भ. भारस्वाडकर सरांच्या कार्याची माहिती तसेच त्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील व्यासंगाबद्दल लिहिले आहे.
‘गझल ब्रह्म’ संग्रहात सगळ्याच गझला अक्षरगण वृत्तातल्या आहेत ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट म्हणायला हवी.
आता संग्रहा बद्दल थोडंस :-
संग्रहात एकूण ८० गझला समाविष्ट केल्या आहेत. त्यातल्या बऱ्याच गझलांना आध्यात्मिक व भारतीय संस्कृतीतील तत्वज्ञानाच्या झालरीची प्रचिती आहे.
‘देव प्रिया’ वृत्तातल्या गझलेचा मतला बघा :-
*आत्मज्ञानाचे धुमारे सळसळावे या पुढे*
*पंचकोषाच्या पल्याडी वळवळावे या पुढे*
भारतीय संस्कृती, तत्वज्ञान अतिशय महान आहे. त्याच्या प्रचारासाठी आपण त्यास पंचकोषाच्या पलिकडे नेऊन ते अधिक प्रगल्भ करायला हवे असे गझलकाराचे म्हणणे आहे.
मंजुघोषा :-
*वाजताना हात माझा टाळ होतो*
*आतमध्ये कामनांचा जाळ होतो*
आषाढी एकादशी निमित्त पंढरीला वारकऱ्यांची वारी जाते.
त्यांच्यात आपण सहभागी होऊन आपल्या हातांचा टाळ करून भजनात मग्न होतो. त्या वारीचा प्रभाव एवढा असतो की आपल्या अंतरंगात असलेली किल्मिशे कुठच्या कुठे जळून जातात. वारीचा प्रभाव एका सामान्य माणसावर एवढा होतो तर विठू माऊलीच्या भक्तीत रंगलेल्या भक्तांचे काय बरे होत असेल!
आता वियदगंगा शेर पहा:-
*कुणाला दाद देतो मी कुणाला कोसतो आहे*
*स्वतःच्या लपउनी त्यांच्या चुका मी शोधतो आहे*
समाजात अशा प्रवृत्तीची माणसे आपल्याला सगळीकडे आढळतात. काही समोरच्या माणसांचे काम आवडले तर त्यांचे कौड कौतुक करतात. तसेच बारीकशा चुकीची निंदानालस्ती करायला मागे राहत नाहीत.
पण हीच माणसे स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करून आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करतात व दुसऱ्यांच्या चुका सारख्या हेरत असतात.
आता खालील राधा वृत्ताला शेर पहा:-
*ताठ मानेने असा मी चाललो आहे*
*गोरगरिबांची कमाई लाटली नाही*
देशात कधी कधी नैसर्गिक आपत्तीमुळे माणसांचे नुकसान होत असते. अशा वेळी सरकार नुकसान भरपाईची म्हणून रोख रक्कम त्यांना देण्याचे जाहीर करतात. पण प्रत्यक्षात त्या माणसांपर्यंत ती संपूर्ण पोहोचतच नाही. हावरट व भ्रष्टाचारी वृत्तीची माणसे ती मधल्या मध्ये हडप करतात.
गझलकारने अशी कुणाची लूट कधी केली नाही. त्यामुळे ते नि:संकोचपणे, ताठ मानेने फिरू शकतात.
आता हा कंदुक वृत्तातला शेर पहा :-
*इथे गच्च झाडी उभी होती*
*सदा वाहणारे झरे होते*
पूर्वी आपला निसर्ग हिरवागार व दाट झाडीचा होता. रानातून सतत वाहणारे पाण्याचे झरे. निर्मळ पाणी देणाऱ्या नद्या होत्या. पण आता लोकवस्ती वाढल्याने झाडांची कत्तल केली जात आहे. जंगले नष्ट करून मोठ मोठे वहातुकीचे प्रकल्प उभारतात. हिरवी जंगले कमी होऊन काँक्रिट जंगले वाढत आहेत. पर्यावरण संरक्षण कसे होईल!
असे एकापेक्षा एक सुंदर शेर संग्रहात आहेत. मला खूप आवडलेले अजून काही शेर मी नमूद करू इच्छिते :-
*सारे मला मिळाले खेळून खेळ येथे*
*जिंकून डाव सुद्धा हारून घेत आहे*
(आनंदकंद)
*लावले कधी न झाड तोडतात रोज ते*
*जंगले मनातलीच राखणार मी कसा*
. (देवराज)
*संस्कृती पाळणे नेमके हरवले*
*जेष्ठ येता घरी वाकले पाहिजे*
(स्त्रग्विणी)
*सर्वेश्वरा मला तू काहीच देत नाही*
*जे वाहिले तुला ते काहीच घेत नाही*
(आनंदकंद)
*फिरून रोज मी इथे कितीदा जगायचे*
*उजाड रानमाळ मी वसायचे पुन्हा कसे*
(कलिंदनंदिनी)
*दयाळा मला तू असे चालवावे*
*जशी आस माझी तसे चालवावे*
(भुजंगप्रयात)
*मुक्तीस माझ्या रस्ता मिळेना*
*बाजार नाही जोहार होते*
(स्वानंद सम्राट)
अशा प्रकारांच्या शेरांनी सजलेला ‘गझलब्रह्म’ संग्रह वाचकांस नक्कीच आवडेल ह्यात शंकाच नाही.
‘गझलब्रह्म’:- गझलकार प्रा. डॉ. रे. भ. भारस्वाडकर
प्रस्तावना:- बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
प्रकाशक:- बाजीगर प्रकाशन- सिराज शिकलगार
मुखपृष्ठ:- हेमंत आर्ट
किंमत:- ₹३००
परीक्षण :-
शोभा वागळे
पुणे
8850466717
