*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*गुरुपौर्णिमा श्रद्धा, ज्ञान आणि संस्कारांचा उत्सव*
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥”
भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरु केवळ शिक्षण देत नाही, तर अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा जीवन मार्गदर्शक असतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा गुरुपौर्णिमा हा सण गुरुंबद्दल आदर, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. म्हणूनच हा दिवस श्रद्धा, ज्ञान आणि संस्कारांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले जाते वेद पुराणे महाभारत ह्या सगळ्या ग्रंथात हेच सांगितले आहे. आपण भारतीय महर्षी वेदव्यासांना आद्यगुरू मानतो, आज महर्षी वेदव्यासांची जयंती असल्याने ह्या दिवसाला व्यासपौर्णिमा म्हणतात.
मनुष्याचा पहिला गुरू म्हणजे जन्मदात्री आई! अनेक संतांनी कवींनी आईचे महत्व विशद केलेले आहे . आई माझा गुरू ,आई कल्पतरू असे म्हटले जाते ते किती योग्य आहे ह्याचाही आपल्याला अनुभव आहेच. मुलाच्या जीवनाला वळण लावण्याचे काम आई वडील करतात, तर गुरू ज्ञान देऊन व्यक्तिमत्व घडवतात. शिस्त प्रामाणिकपणा व आत्मविश्वास निर्माण करतात यशाचा मार्ग दाखवितात
आजच्या आधुनिक, तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाची अनेक साधने उपलब्ध असली तरी गुरुचे महत्व कमी होत नाही पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती शिष्य गुरुघरी राहत असत . त्यांची सेवा करीत . भारतीय परंपरेत अनेक गुरू शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत कृष्ण सांदीपनी, श्रीराम वशिष्ठ, अर्जुन द्रोणाचार्य ह्या गुरुशिष्याच्या जोड्याची आपल्याला अजूनही आठवण आहे.
गुरू म्हणजे फक्त अक्षरओळख करून देणारा किंवा पुस्तकी ज्ञान देणारा वाटाड्या नाही. शिष्याने कसे राहावे, जीवन आदर्श कसे बनवावे, हे आपल्या आचरणाने सांगणारा मार्गदर्शक असतो. आयुष्याच्या वाटेवर भेटणारी प्रत्येक व्यक्ती गुरुच असते असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कुणी व्यक्ती आपल्याला आपुलकी, प्रेम तडजोड जीवनाकडे ,पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन शिकविते, तर कुणी दुःखात ही कसं खंबीर राहावे हे शिकवित असते. वयाने लहान असो किंवा मोठा प्रत्येक व्यक्तीकडे काही तरी शिकण्यासारखे असतेच. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटलेली प्रत्येक व्यक्ती एक प्रकारे गुरुच असते आपली! त्यांच्यामुळेच आपले जीवन समृद्ध होत असते.
गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक सण नसून गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा व त्यांच्या शिकवणीप्रमाणे आदर्श जीवन जगण्याचा प्रेरणादायी दिवस आहे गुरुच्या ज्ञानामुळेच व्यक्ती , समाज व राष्ट्राची प्रगती होत असते म्हणून प्रत्येकाच्या मनात आदराची दृष्टी ठेवली पाहिजे. गुरू आत्म्याला परमेश्वराशी जोडण्याचे काम करतात, आपण त्यांचे उपकार कधीही फेडू शकत नाही एकलव्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणेत द्रोणाचार्यांना दिला होता, ही कथा आपल्याला माहीत आहे संत कबीर गुरुमहिमा सांगतांना म्हणतात–
गुरू गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय?
बलिहारी गुरू आपने, गोविंद दियो बतायअर्थात
गुरुचे स्थान परमेश्वरापेक्षाही मोठे आहे.
तुकडोजी महाराज म्हणतात
*गुरुविणा उद्धार नाही कुणाचा*
गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
