*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*गुरुकुल संस्कृती*
एकेकाळी भारतात ऋषींची गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती. ही पद्धत आदर्श होती. जिथे राम कृष्णाचे ही शिक्षण झाले तिथे धर्म, न्याय, नीतीशास्त्र, विज्ञान, शेती, युद्धशास्त्र अशा सर्व शास्त्रात विद्यार्थी पारंगत व्हायचे. ज्ञानदान हे आपल्या संस्कृतीतले सर्वात महत्त्वाचे दान आहे. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण हे भारताचे वैशिष्ट्य होते. गुरु आणि सर्व विद्यार्थी हे सर्व एकत्र कुटुंबाप्रमाणे राहत असत म्हणून गुरु-कुल हा शब्द आला असावा. शास्त्राध्ययनाबरोबर जीवन कसे जगायचे, समाजात कसे वागायचे या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन गुरुकुलात होत असे. एखाद्या सामान्य नागरिकांचे मूल असो किंवा राम-कृष्ण सारखे देवाचे अवतार असो किंवा राजपुत्र असो आश्रमात जाऊन गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेण्याची परंपरा प्रत्येक जण राखत असे.
ज्या ज्ञानामुळे जीवन सुखकर होणार ते ज्ञान गुरू तत्त्वाने व्यापलेले असते. गुरुला ‘गगन सदृश’ असे संबोधले जाते कारण आकाश तत्व हे गुरुत्वाशी जवळीक साधणारे आहे. सर्व काही सांभाळून घेणारे गुरुतत्त्व आकाशासारखे स्थित असते. गुरु भेदभाव न करता ज्ञानोपदेश करतो. गुरु जीवनात आत्मज्ञानाचा वर्षाव करतो म्हणून गुरुजनांविषयी आदर असायचा व समाजामध्ये समता, बंधुत्वाची भावना व शांती नांदत असे.
भारतीय संस्कृती सगळ्यांपर्यंत पोहोचवणे व भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षक, गुरु किंवा सद्गुरु चे स्थान अटळ असते. त्यांच्याशिवाय जीवनाला पूर्णत्व येत नाही. माता ही तर प्रत्येकाची प्रथम गुरु असतेच. पुस्तकातून आपण ज्ञानग्रहण करतो म्हणून पुस्तक हे सुद्धा आपले गुरु. एकलव्याने तर द्रोणाचार्य यांची मूर्ती समोर ठेवून धनुर्विद्या ग्रहण केली म्हणून ती मूर्ती सुद्धा त्यांचे गुरु होते. आपल्याला जे जे ज्ञान देतात ते सर्व गुरू. गुरूचे महत्त्व निर्विवाद आहे. आपल्याला परमात्म्याची ओळख करवणारे परमात्म प्राप्तीपर्यंत पोहोचवणारे ते सद्गुरु.
श्री सिताराम महाराज भजनात म्हणतात, “सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे
तव आगमने विघ्ने पळती”
सद्गुरु मुळे आयुष्याचा मार्ग सुकर होतो त्यांना हृदयात बसवावे. सात्विकता शांती आपसुक येईल. व्यक्तिगत उत्कर्ष होण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणे हे सद्गुरूंचे कार्य असते. सद्गुरू संस्कृतीचे रक्षण करतात. ‘महर्षी व्यास’ हे सद्गुरु आहेत त्यांना ‘भगवान वेदव्यास’ असे म्हणतात. सर्व ऋषींमध्ये ते श्रेष्ठ आहेत. व्यास हे जगद्गुरु आहेत. सद्गुरु नसते तर भारतीय संस्कृती कधीच लयाला गेली असती.
आता गुरुकुलाची जागा शाळांनी घेतली आहे. जीवनात प्रगतीसाठी शिक्षण हवेच आहे. स्वातंत्र्यानंतर तंत्रज्ञान प्रगतीने पारंपारिक शिक्षण पद्धती बंद झाल्या पण तरीही शाळा सुद्धा सरस्वतीचे मंदिर असल्याने त्याचे पावित्र्य राखले जाते. शाळेत संस्कार होतात.
‘व्यास पौर्णिमा’म्हणजेच ‘गुरुपौर्णिमा गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु म्हणजे हृदयातील गुप्त रूप जे आपल्याला असमाधानाकडून- समाधानकडे,दुःखाकडून सुखाकडे व तिमीराकडून प्रकाशाकडे नेतात. गुरूंच्या सेवेत लीन होणं म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करणे. जो आपले तन मन गुरुचरणी समर्पित करतो, गुरूंच्या आज्ञेचे पालन करतो त्याच्या सर्व जबाबदाऱ्या गुरु स्वतः स्वीकारतात त्याला ज्ञान विवेक आणि साधनेचा मार्ग दाखवतात आणि त्याचे जीवन पार करतात. हीच आत्मिक संपत्ती मिळवण्याची किल्ली आहे. गुरूंचा आशीर्वाद म्हणजेच आत्मिक प्रगतीचा पाया. गुरु शिष्यांना चुका दाखवून त्यांच्या आत्म्याची शुद्धी करतात, त्यांचे दोष दूर करतात आणि मार्गदर्शन करतात. गुरुंची आराधना गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष होते कारण गुरुविद्येत म्हटले आहे गुरु आराधनेनी सुख समृद्धी व परब्रह्माची प्राप्ती होते.
अशी ही भारतीय गुरुकुल संस्कृती अतिशय प्राचीन आहे. भारत ही अशा विविध संस्कृतींची भूमी आहे.
“गुकारस्त्वन्धकार:स्यात् रुकारस्तद-विनाशकृत |
अन्धकारविनाशत्वात गुरूरित्यभिधीयते ||
श्री गुरूगीता
(गुरू शब्दातील ‘ग’कार अंधकाराचा निर्देशक आहे तर ‘र’कार अंधकाराचा नाश करण्याचा निर्देशक आहे म्हणून अंधकाराचा नाश करणाऱ्याला ‘गुरु’ म्हटले जाते येथे अंधकार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार. अज्ञान दूर करून ज्ञान म्हणजे अनुभव देऊन संस्कार रुजवतात ते गुरु.)
सौ. अनघा अनिल कुळकर्णी
पुणे. 🙏
