*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जरी रिती माझी झोळी…*
पांडुरंग पांडुरंग
नाम सदा ओठावरी
भाव मनी भरलेला
रिती माझी झोळी जरी
ठावे आहे मज सारे
नसतोस तू गाभारी
मुखी घाली दोन घास
होउनिया शेतकरी
पहाटेस पक्षी गाती
किती गोड त्यांचे बोल
परि मज ऐकू येते
बोल विठ्ठल विठ्ठल
पावसाळा येतो जेव्हा
होतो थेंब तू टपोरा
भिजवितो रान सारे
होउनिया जलधारा
असा माझा विठुराया
वास त्याचा जळीस्थळी
राहणार सांगा कशी
रिती भक्तांची ही झोळी
@अरुणा गर्जे, नांदेड
