You are currently viewing त्याचा वेगळाच थाट

त्याचा वेगळाच थाट

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*त्याचा वेगळाच थाट*

 

आषाढीच्या वाटेवर दाटे भक्तीची चाहूल

त्याचा वेगळाच थाट आणि दिमाख अफाट,

टाळ-मृदुंग निनादे नाम अखंड गजर

साक्ष देई चंद्रभागा प्रेमभक्तीचा विराट..

 

पायी चाले वारकरी ओठी “रामकृष्ण हरी”

नेत्री विठ्ठलाचे रूप दाटे अंतरात परी,

दु:खओझे विसरुनी हसताती जीव सारे

भक्तिभाव संगतीने लाभे जीवनाला झरी..

 

तुळशीची माळ गळा कपाळी गंध

जाती धुऊन विकारे होई मनही पवित्र,

नाद एक ध्यास एक तोच “विठ्ठल विठ्ठल”

प्रेमरुपी या यात्रेचा वेगळे दिव्य चरित्र..

 

नाही श्रीमंत,गरीब येथे असा भेदभाव

एक ओळख भक्तीची आणि विठ्ठलाचा ठाव,

हाती भगवी पताका अंतरात विश्वदीप

प्रेमाच्या या वारीमध्ये असे जीवनाचा भाव..

 

भक्त पुंडलिक सेवे विटेवरी उभा देव

करुणेच्या हास्यातला अवघा विश्वाचा ठेवा,

जगण्याच्या क्षणोक्षणी दया शिकवण देई

नामस्मरणी उमले भक्तिमार्गाचाच मेवा..

 

आषाढीची एकादशी भक्तीमय हा सोहळा

निघे विठ्ठल न्हाऊन जनमनाचा उजाळा,

म्हणूनच म्हणताती धन्य पंढरीची वाट

त्याचा वेगळाच थाट संत सज्जनांचा मेळा..

 

 

सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा