You are currently viewing भ्रष्टाचारामुळेच कणकवलीचा निधी मागे…

भ्रष्टाचारामुळेच कणकवलीचा निधी मागे…

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा आरोप ; कुडाळच्या आमदारांकडून कणकवलीची बदनामी..

कणकवली

शहरातील भूमिगत वीज वाहिन्यांसाठी आलेला ६ कोटीचा निधी मागे जाण्यामध्ये आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे असा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज केला. तसेच माहिती न घेता आमदार नाईक आणि त्यांचे सहकारी संदेश पारकर यांनी आरोप करू नयेत. तसेच चुकीचे आरोप करून कुडाळ मतदारसंघाच्या आमदारांनी कणकवलीची बदनामी थांबवावी असेही आवाहन नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी केले.
येथील नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नाईक, पारकर यांनी केलेल्या आरोप खोडून काढले. यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, महेश सावंत आदी उपस्थित होते.
श्री.नलावडे म्हणाले, सावंतवाडी, वेंगुर्ले प्रमाणेच कणकवली शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला होता. या वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई आणि दुरूस्तीसाठी कणकवली नगरपंचायतीने प्रतिमिटर ७६४.१४ रुपये असा दर निश्‍चित केला होता. हा दर इतर नगरपालिकांच्या तुलनेत सर्वांत कमी होता. त्यामुळे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात कोणतीच समस्या नव्हती. मात्र नाईक-पारकर यांच्या अ‍ॅडजेंस्टमेंटमुळे ठेकेदाराने वीज वाहिन्यांचे काम सुरू केले नाही. त्यानंतर आता नाईक आणि पारकर हे आम्ही ५००० रुपये प्रतिमिटर असा दर लावला म्हणून निधी मागे गेल्याचा खोटा आरोप करत आहेत.
कणकवली प्रमाणेच सावंतवाडी शहरासाठी आलेला भूमिगत वीज वाहिन्यांसाठीचा ११ कोटी रुपयांचा निधी मागे गेला आहे. त्यावेळी सावंतवाडी नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. बबन साळगावकर हे नगराध्यक्ष ते दीपक केसरकर हे पालकमंत्री होते. सावंतवाडी नगरपालिकेने तर तब्बल २४०० रुपये प्रतिमिटर एवढा दर निश्‍चित केला होता. तरीही तेथे भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू झाले नाही. मात्र ही बाब शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर सोईस्कर रित्या लपवत आहेत. भूमीगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनीच ठेकेदार आणले होते. मात्र ठेकेदार आणि त्यांच्यात अ‍ॅडजेस्टमेंट न झाल्याने निधी मागे गेला आहे. त्याचे खापर मात्र नाईक-पारकर हे आमच्यावर फोडू पाहत आहेत असाही आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा