श्री तुकाराम मुंढे शेतकऱ्याचा मुलगा झाला कमिश्नर
आज श्री तुकाराम मुंढे यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहेत. एक अतिशय कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय प्रामाणिक व कायद्यानुसार चालणारा अधिकारी म्हणून त्यांच्या नावलौकिक आहे. अल्पावधीमध्ये अनेक बदल्या झालेले सनदी अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. ते ज्या विभागात जातात तो विभाग ते स्वच्छ करतात. साहजिकच हे त्या विभागातील अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना तसेच मंत्र्यांना रुचत नाही आणि मग ते मुख्यमंत्र्यांना साकडे घालतात. आणि श्री तुकाराम मुंढे यांची बदली होते.
बदलीच्या संदर्भात श्री तुकाराम मुंढे यांची भूमिका ठरलेली आहे .तुम्ही माझी बदलीच करू शकता .इतर काही नाही आणि म्हणून आज अत्र तत्र सर्वत्र श्री तुकाराम मुंढे यांचा बोलबाला आहे. ते एक ऑगस्ट 2026 रोजी अमरावतीला येणार आहेत. पण ते येण्यापूर्वीच अमरावतीची त्यांच्या विभागातील साफसफाई सुरू झालेली आहे. लोकांना वाटते आपल्या दुकानात तर ते धाड टाकणार नाहीत ? आपले लायसन तर ते कॅन्सल करणार नाहीत ? पण हे त्याच लोकांना वाटते की जे मिसळ करतात .दुधामध्ये वाटेल ते मिळवतात. खव्यामध्ये काय काय टाकतात हे त्यांनाच माहीत .पण श्री तुकाराम मुंढे हे या विभागात आल्यामुळे आता सर्वांचे धाबे दणाणले आहे.
तसं जर पाहिलं तर श्री तुकाराम मुंढे हे कला शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत आणि खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्यांचे चिरंजीव आहेत. बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना लहानशा गावात राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. वडिलांना वेळोवेळी शेतीमध्ये खऱ्या अर्थाने मदत केलेली आहे. कारण शेती करण्यासाठी जे मजूर लागतात त्या मजुरांचे पैसे घेण्याची त्यांची मजुरी देण्याची ऐपत श्री तुकाराम मुंढे यांच्या वडिलांकडे नव्हती. शिवाय पीकपाणी व्हायचे ते बेताचेच. म्हणून श्री तुकाराम मुंढे व त्यांचे बंधू श्री अशोकराव मुंडे हे बाबांना शेतीच्या कामात मदत करीत असत.तिसरे भाऊ बाबासाहेब हे दिव्यांग असल्यामुळे ते इच्छा असूनही आपल्या बाबांना मदत करू शकत नव्हते.
आपला महाराष्ट्रातील मराठवाडा म्हणजे तसा समृद्ध भाग नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या मुबलक प्रमाणात पाणी आहे .त्यामुळे तो भाग समृद्ध आहे. परंतु मराठवाड्याच्या कपाळी नेहमी दुष्काळ किंवा मागासले पण कोरल्या गेले आहे आणि ते निसर्गनिर्मित आहे .त्यातही बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना हे गाव कसे सुटणार ?
या बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना गावातील जन्मलेले तुकाराम मुंढे यांच्या पायात ते मॅट्रिकला असेपर्यंत चप्पल नव्हती असे कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही. परंतु ती वस्तुस्थिती आहे. शेतातली काम करण्यासाठी चपलांची गरज होती .जोड्याची गरज होती .परंतु वडील हरिभाऊ यांना प्रश्न पडायच्या की आपला संसार चालवायचा की मुलांना चप्पल घेऊन द्यायची. अर्थातच संसार चालवणे हे महत्त्वाचे होते. रोज शेतात जाणे येणे करावे लागत होते .त्यामुळे चिखल तुडवत काटे पायात रूतत असताना तुकाराम यांना शेतात जावे लागत होते .काम करावे लागत होते आणि शाळाही करावी लागत होती .परंतु हे सर्व करीत असताना त्यांनी आपला अभ्यास काळजीपूर्वक केला. या कामी त्यांचे बंधू श्री अशोकराव यांची त्यांना समर्थ साथ मिळाली
श्री तुकाराम मुंढे यांना शिस्तीचे न्यायप्रियतेचे प्रशिक्षण मिळाले ते वडील श्री हरिभाऊ मुंढे यांच्याकडून. परिस्थिती जरी चांगली नव्हती तरी हरिभाऊ मुंढे यांचा गावामध्ये चांगला नावलौकिक होता. त्यांचा कोर्ट कचऱ्यांचा चांगला अभ्यास होता. त्यामुळे गावातील लोक त्यांच्या सल्ला घ्यायला यायचे.
हरिभाऊंनी देखील या कामात कधी हात मागे घेतला नाही. ते तुकारामला नेहमी सांगायचे शिस्तीने न्यायाने वागायचे आणि आपण या सर्वसामान्य लोकांसाठी काय करू शकतो ते केले पाहिजे.
श्री तुकाराम मुंढे हे पाहत होते आणि आपल्या ठिकाणी ते रुजवत होते. दहावीला असताना ते पहिल्यांदा औरंगाबादला आले म्हणजे आताचे संभाजीनगर. पहिल्यांदा बसमध्ये बसले. आज तर मुले जन्मताबरोबरच विमानाने प्रवास करतात. पण तुकाराम सरांना हे भाग्य मिळाले नाही .पण म्हणतात ना
श्रुंखला पायीच असू दे
मी गतीचे गीत गाईन
दुःख झेलण्यास आता आसवांना वेळ नाही
या बाबा आमटे यांच्या कवितेप्रमाणे ते काम करीत राहिले. श्री हरिभाऊ मुंढे यांना पूर्ण परिवार शेतावर चालवावा लागत होता. शेतात चांगले उत्पन्न झाले तर वर्षे चांगले जायचे .पण नाही झाले तर मात्र पंचायत व्हायची.प्रसंगी व्याजाने पैसे देखील काढावे लागत होते. ते फेडता फेडता नाकी नऊ यायचे .पण दुसरा इलाज नव्हता. खाजगी सावकाराचे कर्ज हे जास्त दराचे असते. बँकासारखे सुलभ दर त्यांचे नसतात.
वडील श्री हरिभाऊ मुंढे यांच्यापासून बऱ्याच गोष्टी श्री तुकाराम मुंढे हे शिकले. माणुसकी काय असते ती कशी करायची असते कशी अनुभवायची असते याचे एक उदाहरण या ठिकाणी द्यावेसे वाटते. श्री हरिभाऊ मुंढे यांची कोर्टात एक केस सुरू होती. तारखेवर ते गेले. कोर्टाला वेळ होता म्हणून झाडाखाली जेवण करायला बसले.
त्याच झाडाखाली त्यांचे विरोधक बसले होते. हरिभाऊंनी आपले शिदोरी सोडली. आणि विरोधकांना जेवण करायला बोलाविले. श्री तुकाराम मुंढे यांनी बाबांना विचारले .बाबा ते तर आपले विरोधक आहेत. त्यावर हरिभाऊ म्हणाले .अरे ते प्रकरण कोर्टात आहे .एक माणुसकी या नात्याने आपल्या गावकीच्या नात्याने आपण जेवायचे व त्यांना उपाशी ठेवायचे हे माझ्या मनाला पटत नाही .जो काय निर्णय होईल तो कोर्टात होईल. पण आता माझ्या मनाला प्रामाणिकपणे वाटते की त्यांनी माझ्याबरोबर दोन घास खाल्ले पाहिजेत. ही गोष्ट तुकाराम सरांच्या मनावर कायमची बिंबवल्या गेली.
श्री तुकाराम सरांचे बंधू श्री अशोकराव मुंढे यांनी त्यांना समर्थ साथ दिली. अशोक रावांनी तुकाराम सरांना संभाजीनगरला नेऊन शिक्षण देण्याचे ठरविले .या गोष्टीला वडील श्री हरिभाऊ यांचा विरोध होता. दोन्ही भाऊ जर संभाजीनगरला शिकायला गेले तर शेतीचे कामे कोणी करायची ? तिसरे बंधू तर दिव्यांग असल्यामुळे ते शेतीच्या उपयोगात पडणारे नव्हते. पण अशोकरावंना वाटत होते .तुकाराम हुशार आहे .तो जर संभाजीनगरला शिकला. तर चांगली प्रगती करू शकेल. आणि म्हणून वडिलांना गुंगारा देऊन अशोकरावने तुकाराम सरांना संभाजीनगरला घेऊन येण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
तशी अशोकरावांची परिस्थिती नाजूकच होती. इंग्रजीचा स्पीकिंग क्लास ते घेत होते. त्यातून त्यांच्या स्पर्धा परीक्षेचा खर्च संभाजीनगरचा खर्च भागवत होते.
मित्रांनो तुम्हाला सांगून खरे वाटणार नाही. तुकाराम सरांनी संभाजीनगरला प्रवेश घेतला. जवळ पैसे असण्याचे कारणच नव्हते. कारण वडिलांना गुंगारा देऊन अशोकरावने त्यांना संभाजीनगर ला आणले होते. त्यांना गावातून टीसी मिळायला देखील वेळ लागला. कारण त्या गावातील मुख्याध्यापकांना वाटत होते की तुकाराम हा हुशार मुलगा आहे .तो मेरिटमध्ये येऊ शकतो .असा हुशार मुलगा जर आपल्या शाळेतून निघून गेला तर आपले कसे होईल ? म्हणून विलंबानेच त्यांना टीसी मिळाली. संभाजीनगरला प्रवेश मिळाला .पण पहिल्याच दिवशी शाळेतील अध्यापकीने त्यांना तुला शाळेचा पोशाख नाही म्हणून वर्गात बसू दिले नाही. अर्थात पैसे घेण्यासाठी पैसे नव्हते. अशोकरावांनी अध्यापिका मॅडमला हे समजावून सांगितले व एक मुदत मागितली. एक महिनाभर तुकाराम सर शाळेचा पोशाख शिवू शकले नाहीत.
अशा परिस्थितीत शिकलेला मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला आहे. तो त्याच्या शिस्तबद्ध न्यायप्रिय वागणुकीमुळे. आणि म्हणूनच तुकाराम सरांपासून घेण्यासारखे भरपूर आहे .झाले बहू. होतील बहू. परंतु या सम हा .हा संदेश तुकाराम सरांबाबत तंतोतंत लागू होतो
एक शेतकऱ्याचा मुलगा. खऱ्या अर्थाने शेतीत काम करणारा राबणारा मुलगा शाळेत जाताना पोशाख नसलेला मुलगा जर आज एक चांगला सनदी अधिकारी होऊ शकतो तर आपण का होऊ शकत नाही. नवीन पिढीला तुकाराम सर एक आदर्श म्हणून आहेत. म्हणून दिनांक एक ऑगस्ट रोजी अमरावतीला सायंकाळी पाच वाजता पोटे टाऊनशिप मधील विवेकानंद सभागृह सभागृहात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मला खात्री आहे की त्यांच्या व्याख्यानाने अनेक तरुण व अनेक नागरिक पेटून उठतील आणि उद्याचे तुकाराम होतील.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
९८९०९६७००३
