You are currently viewing भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा

संस्कृत साहित्याचा गौरव; विद्यार्थ्यांसाठी संधि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी :

येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये जिज्ञासा संस्कृत क्लब तसेच संस्कृत संहिता-सिद्धांत विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवन आणि महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रथम वर्ष बी.ए.एम.एस.च्या विद्यार्थिनी आर्या पाटील, प्रज्ञा पोळ, निकिता मिश्रा आणि अनार्या यांनी महाकवी कालिदास यांच्या संस्कृत साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यांच्या साहित्यिक कार्यावर भाषणे सादर करत संस्कृत भाषेचे संवर्धन आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील तिचे अनन्यसाधारण महत्त्व विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले.
संहिता-सिद्धांत विभागप्रमुख प्रा. वैद्य बी. डी. पाटील यांनी आयुर्वेद शिक्षणामध्ये संस्कृत भाषेचे मूलभूत स्थान स्पष्ट करत, आयुर्वेद अध्ययनासाठी संस्कृतचे ज्ञान अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी संस्कृत संधि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम वर्ष बी.ए.एम.एस.च्या विद्यार्थ्यांचे दहा गट करून अत्यंत चुरशीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रा. वैद्य राजेशकुमार सवई (शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड) यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास प्रा. वैद्या मुग्धा ठाकरे आणि प्रा. वैद्या भारती घाडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन प्रा. वैद्या शीतल पाटील (सचिव, जिज्ञासा संस्कृत क्लब) यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि भारतीय ज्ञानपरंपरेविषयीची जिज्ञासा अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा