रांगणा सफर २०२६ उत्साहात संपन्न; दुर्गसंवर्धनासह पर्यावरणाचा संदेश
सिंधुदुर्ग
दुर्ग मावळा प्रतिष्ठान, सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली–सांगेली तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन विकास समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रांगणा सफर २०२६’ रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे सलग तिसऱ्या वर्षी या ऐतिहासिक दुर्गसफरीचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याबरोबरच दुर्गप्रेमींना रांगणागडाचा इतिहास, वास्तुशिल्प आणि नैसर्गिक वारसा प्रत्यक्ष अनुभवता यावा, या उद्देशाने पावसाळ्यात अशा दुर्गमोहिमा आयोजित केल्या जातात.
या सफरीमध्ये दुर्गदर्शन, दुर्गपूजन, दुर्गसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रात्यक्षिके, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जांभूळ, बहावा आणि वड या देशी वृक्षांच्या रोपांचे लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या दुर्गसफरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाच वर्षांच्या बालकापासून ते ऐंशी वर्षांच्या ज्येष्ठ दुर्गप्रेमींपर्यंत सर्व वयोगटातील सहभागींचा उत्स्फूर्त सहभाग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४६ दुर्गप्रेमींनी या मोहिमेत सहभाग नोंदवून इतिहास, निसर्ग आणि साहसाचा अनोखा अनुभव घेतला.
सफरीच्या समारोपप्रसंगी सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले. तसेच प्रत्येक दुर्गप्रेमीला सहभाग प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या सहभागाचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी भविष्यातही अशा दुर्गसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा संकल्प व्यक्त केला.
