*जागतिक साकव्य विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे यांनी केलेलं दीपक पटेकर दीपी लिखित “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाचे परीक्षण*
*बकुळीची फुले*
(वृत्तबद्ध कविता संग्रह परीक्षण)
‘बकुळीची फुले’ हा दीपक पटेकर (दीपी) लिखीत वृत्तबद्ध कविता संग्रह. माझ्या नुकत्याच पार पडलेल्या दोन संग्रहांच्या प्रकाशन समारंभात आला असताना दीपीनेच मला तो दिला. काव्यसंग्रह मी लगेच वाचून काढला. कुठलेही पुस्तक हातात पडताच अगोदर मी पुस्तकाची पाठराखण वाचून काढते. त्यात कवीची ओळख आणि काव्य संग्रहाची सुद्धा थोडी ओळख होते. त्यानंतर मी प्रस्तावना वाचायला घेते. प्रस्तावना वाचल्यावर संग्रहात काय असेल याचा अंदाज येतो. प्रस्तावना वाचून मन आनंदित झाले की नंतर पुस्तक वाचायला घेते.
‘बकुळीची फुले’ हा दीपीचा कविता संग्रह वाचत असताना एका नंतर एक अशा साठ कविता कधी वाचून झाल्या, कळलेच नाही.
दीपीच्या बहुतेक कविता मात्रा वृत्तातल्याच आहेत. विजो सरांनी कार्यशाळेत सांगितलेले आठवले “वृत्तबद्ध कविता लिहिताना लय असावीच लागते.” त्याप्रमाणे दीपीच्या सगळ्या कविता लयबद्ध आहेत.
कोकणची लाल माती आणि संध्याकाळ ते पहाटेपर्यंत टपटप पडणारी बकुळीची टवटवीत शुभ्र सुंगंधित फुले! एक एक फुल वेचून माळ करण्याचा आनंद तो काय वर्णावा! माझे बालपणीचे ते दिवस आठवले. दीपीच्या कवितांमधूनही तोच आनंद घेता आला.
दीपीच्या बहुतेक कविता मात्रा वृत्तातल्या व छंदोबद्ध आहेत. द्विपदी प्रकारात जवळ जवळ पंचवीस रचना आहेत. गीत व धृपदात ही रचना आहेत.
पादाकुलक, अनलज्वाला, लवंगलता, वनहरिणी, प्रियलोचना, भूपति, आनंदकंद, कलिंदनंदिनी अशा विविध वृत्तातल्या अन् निसर्ग, समाज, प्रेम – शृंगार, नाते संबंध, वास्तव, राजकिय, मन, संसार, ईश्वर – भक्ती, देशाभिमान इत्यादी विविध विषयांवरील कविता लिहिलेल्या आहेत. ‘बकुळीची फुले’ संग्रहातल्या सर्वच कविता मनाला भिडणाऱ्या आहेत.
कवितांची भाषा साधी सोपी आणि संवादात्मक
अशीच असल्याने वाचक कवितांच्या प्रेमात पडतोच.
पहिलीच कविता बघा, ‘माझा गाव’
*सुंदर माझा गाव नाव ते सुंदरवाडी*
*शोभून दिसेल तलावाकाठी दगडी माडी*
अनलज्वाला मात्रा वृत्तातली ही रचना वाचत असता प्रत्यक्ष कोकणातले गाव माझा डोळ्यासमोर तरळत असतो अन् गावाचा आनंद घेता येतो.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ह्या संत तुकारामाच्या अभंगाची आठवण करून देणारी कविता :-
*माना झाडे, सगेसोयरे*
*गरजेनुसार येती कामी*
*सुगंध दरवळ अनुभवण्याची*
*नकाच सोडू संधी नामी*
बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्ष मानसी’या कवितेची आठवण करून देणारी कविता ‘मनभावन श्रावण’ या वनहरिणी वृत्तातल्या द्विपदी कवितेच्या ओळी बघा :-
*श्रावणातला उन पाउस हा छपाछपीचा खेळ मनोहर*
*नभांगणीच्या इंद्रधनूची क्षितिजावरती कमान सुंदर*
*तू मिटता डोळे नयनांमध्ये हसते*
*अन् खळी लाजरी गालावरती खुलते ||धृ ||*
भूपति वृत्तातले हे अतिशय सुंदर प्रेमगीत आहे.
‘संस्कार’ ह्या द्विपदी कवितेत किती करुण
भाव कवीने व्यक्त केलेत बघा :-
*पोटासाठी ओझे माथी कमरेवरती मुले*
*अंधारमयी जीवनात या फुलतील कशी फुले*
तर दुसरी कविता ‘बाळ गोजिरा’ ह्या कवितेतले कडवे बघा :-
*बोट कोवळे धरुनी हाती*
*बाळ तान्हुले बघ बागडते*
*लोभस मुखडा हसता गाली*
*घर अंगणही स्वर्ग भासते*
*नकली नोटा चलनामध्ये, दिवसा कोणा दिसले तारे*
*सांभाळूनी रहा मित्रहो, निवडणुकीचे आले वारे*
*शोभा असते लेक घराची*
*आनंद घरी नांदतसे*
*नाते दोन्ही घरी जोडुनी*
*अतूट बंधन बांधतसे*
*वय साठीचे होउन सुद्धा खुशीत जीवन जगतो*
*गालावरची लाली पाहुन हळूच आम्ही हसतो*
अशा प्रकारच्या मनाला भावणाऱ्या प्रगल्भ रचना ‘बकुळीची फुले’ या संग्रहात आहेत
वृत्तबद्ध कवितांमध्ये प्रगल्भ प्रतिभा असलेले व अनेक वृत्तबद्ध कवितांची कार्यशाळा घेऊन अनेकांना वृत्तबद्ध कविता लिहिण्यास प्रोत्साहित करणारे गुरूवर्य, कवी, गझलकार, समीक्षक मा. विजय जोशी (विजो) सरांनी या संग्रहास प्रस्तावना दिली आहे.
या संग्रहाची पाठराखण मा. प्रा. डॉ. जी.ए. बुवा (निवृत्त उपप्राचार्य, ग्रंथपाल, सावंतवाडी संस्थान इतिहासाचे विशेष अभ्यासक) ह्यांनी केली आहे.
दीपक पटेकर (दीपी) यांनी सुद्धा सरांच्याच कार्यशाळेत मार्गदर्शन घेऊन संग्रह प्रकाशित करण्याचे धाडस केले आहे. या सर्व कविता गुरूच्या नजरेखालून गेलेल्या आहेत व त्या तेवढ्याच जबरदस्त व प्रगल्भ आहेत.
संग्रहाचा शीर्षक अतिशय रास्त आहे. बकुळीची फुले कोमेजली, सुकली तरीही ती तितकीच सुगंधी राहतात. तशाच प्रकारच्या दीपीच्या कवितांचा स्वाद दिर्घकाळ टिकणारा आहे. आपण स्वतः वाचून कवितांचा आस्वाद अवश्य घ्यावा.
संग्रहाचे मुखपृष्ठ:- अपर्णा जाधव
प्रकाशक:- आरती रेडेकर
किंमत फक्त:- ₹१००
समीक्षण :-
शोभा वागळे
पुणे
8850466717
