*रानभाज्या आरोग्यासाठी मस्त… विद्यार्थ्यांनी केल्या फस्त!*
*घारपी शाळेत पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद*
*बांदा*
पावसाळा सुरू होताच कोकणातील डोंगरदऱ्या, शेतशिवार आणि जंगल परिसरात विविध प्रकारच्या पौष्टिक रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. चव, पौष्टिकता आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या या रानभाज्यांचे आपल्या पारंपरिक आहारात विशेष स्थान आहे. मात्र बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडच्या वाढत्या प्रभावामुळे या अमूल्य खाद्यपरंपरेपासून नवी पिढी दूर जात आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक अन्नसंस्कृतीची ओळख व्हावी, रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व समजावे आणि नैसर्गिक, सकस आहाराची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथे ‘रानभाजी महोत्सवा’चे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरातून विविध प्रकारच्या रानभाज्या गोळा केल्या. टाकळा, कुर्डू, शेवगा, अळू, बांबूचे कोंब, अळंबी तसेच परिसरात उपलब्ध असलेल्या इतर अनेक रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रत्येक रानभाजीचे स्थानिक नाव, पौष्टिक मूल्य, औषधी गुणधर्म, ती आढळणारी ठिकाणे आणि आहारातील उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या रसदार भाजी, पातळ भाजी, भजी, चटणी, थालीपीठ, लोणचे, वडे तसेच इतर पारंपरिक पदार्थांचे आकर्षक खाद्यप्रदर्शन भरविण्यात आले. प्रत्येक पदार्थाची माहिती विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थितांसमोर आत्मविश्वासाने सादर केली. त्यामुळे हा उपक्रम केवळ खाद्यप्रदर्शनापुरता मर्यादित न राहता ज्ञान, कौशल्य आणि प्रभावी सादरीकरणाचा सुंदर संगम ठरला.
तयार करण्यात आलेल्या सर्व पदार्थांचा विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतला. “रानभाज्या आरोग्यासाठी मस्त… विद्यार्थ्यांनी केल्या फस्त!” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार झाला. विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांची चव अनुभवत त्या आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी रानभाज्यांमधील जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, तंतुमय घटकतसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पोषक घटकांची माहिती देण्यात आली. नियमितपणे रानभाज्यांचा आहारात समावेश केल्यास रक्तक्षय, कुपोषण यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते आणि शरीर निरोगी राहते, असे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.
हा उपक्रम मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांनी यशस्वीपणे राबविला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत, पोलिस पाटील समृद्धी गावडे, आशा सेविका उत्तरा नाईक, तसेच संतोष कविटकर, विजय कविटकर, संजय गावडे, वासुदेव नाईक आदी पालक उपस्थित होते.
उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, उत्स्फूर्त सहभागाचे आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले. ग्रामीण भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे संवर्धन करत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराची सवय रुजविणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
