You are currently viewing बालविवाह प्रकरणात अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश

बालविवाह प्रकरणात अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश

बालविवाह प्रकरणात अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश; निकम दाम्पत्याला जामीन

विशेष न्यायालयाचा आदेश; गणेश व संगीता निकम यांची प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्तता

ओरोस :

बालविवाह लावून दिल्याच्या आरोपावरून कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी गणेश तानाजी निकम व संगीता गणेश निकम यांना ओरोस येथील मे. विशेष न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी केलेल्या सविस्तर युक्तिवादानंतर विशेष न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी हा आदेश पारित केला.
कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६४ (२) (i), ६४ (२) (m), ५४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ मधील कलम ४, ६, १७ आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ मधील कलम ९, १०, ११, १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपींनी तिचा विधीसंघर्षग्रस्त बालकाशी बालविवाह लावून दिला व त्यानंतर दोघांना एकत्र वास्तव्यास राहण्यास परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडताना आरोपींविरुद्ध प्रत्यक्ष मुख्य गुन्ह्याचा आरोप नसून त्यांच्यावर केवळ सहाय्य (Abetment) केल्याचा आरोप असल्याचे स्पष्ट केले. तसेच तपासासाठी आरोपींची पुढील कोठडी आवश्यक नसल्याचे आणि प्रकरणातील इतर परिस्थितीही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने गणेश तानाजी निकम व संगीता गणेश निकम यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामिनावर, आवश्यक अटी व शर्तींसह नियमित जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय विजय रजपूत, कैस शेख व अॅड. भूषण कदम यांनी सहाय्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा