You are currently viewing कुडाळात १८ जुलैला रंगणार ‘संतरंग – प्रवास वारीचा… विठ्ठल भेटीचा’ भक्तिमय संगीत सोहळा
Oplus_16908288

कुडाळात १८ जुलैला रंगणार ‘संतरंग – प्रवास वारीचा… विठ्ठल भेटीचा’ भक्तिमय संगीत सोहळा

४५ ते ५० कलाकारांचा सहभाग; नृत्य, नाट्य, संगीत, अभंग आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय अनुभव

कुडाळ : आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणानंतर आता कुडाळ नगरीत विठ्ठलभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. सई एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि हर्षनाद सादर करीत असलेला ‘संतरंग – प्रवास वारीचा… विठ्ठल भेटीचा…’ हा आगळावेगळा संगीत, नृत्य, नाट्य आणि गायनाचा कार्यक्रम १८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ ते ५० गुणी कलाकारांच्या सहभागातून साकारला जाणारा हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून वारकरी संप्रदायाची परंपरा, संतवाङ्मय, अभंग, भक्ती आणि पंढरपूरच्या वारीचा जिवंत अनुभव रसिकांसमोर उभा करणार आहे. नाट्य, नृत्य, संगीत, गायन आणि वादन यांच्या सुरेल संगमातून उपस्थितांना प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा भावस्पर्शी आणि अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती हर्षनिल यांची असून, संकल्पना व प्रमुख गायन हर्षद प्रमोद मेस्त्री यांचे आहे. कार्यक्रमाचे दिग्दर्शन निलेश बळकृष्ण गुरव यांनी केले असून गीत-संत रचना व प्रथमेश मेस्त्री, संवाद प्रथमेश पवार, नृत्य दिग्दर्शन भूषण बाक्रे, समर्थ गवंडी व तेजस पिंगुळकर, संगीत योगेश प्रभू व हर्षनाद टीम, संयोजन कल्पेश मेस्त्री व हर्षनाद टीम, तर व्यवस्थापन विजय वालावलकर, सावन जळवी यांनी सांभाळले आहे. संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

वारीतील रिंगण, अभंगांचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद, भक्तीचा उत्साह आणि विठ्ठल भेटीची ओढ यांचे प्रभावी चित्रण या कार्यक्रमातून अनुभवता येणार असून, सिंधुदुर्गातील रसिकांनी या अद्वितीय भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा