You are currently viewing सिंधुदुर्ग क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्टाचे १५ जुलैला लोकार्पण
Oplus_16908288

सिंधुदुर्ग क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्टाचे १५ जुलैला लोकार्पण

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते, पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोहळा

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्ट तसेच विविध खेळांसाठी अत्याधुनिक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा तसेच खेळाडूंच्या सरावासाठी अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात आले आहे. याशिवाय कबड्डी, कुस्ती, तायक्वांदो, हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, मैदानी खेळ, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, जलतरण आदी खेळांसाठी आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले साहित्यही उपलब्ध करण्यात आले आहे.

या सुविधांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी स्थानिक पातळीवरच दर्जेदार सरावाची संधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील विविध अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा