कै. सुधीर तेली यांच्या स्मरणार्थ कुडाळला वैकुंठ रथ; ओंकार तेलींच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण; “पदापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देणारे ओंकार तेली प्रेरणादायी”
कुडाळ
कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार उर्फ बिट्टू तेली यांनी आपल्या वडील कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मरणार्थ कुडाळवासीयांसाठी वैकुंठ रथ उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. या वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी ओंकार तेली यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “कोरोना काळात ज्यांनी आपली माणसं गमावली, त्यांनाच दुःखाची खरी किंमत कळते. अशा वेळी समाजातील शेवटच्या घटकाचाही विचार करून उपक्रम राबविण्यासाठी मोठे मन लागते. ओंकार तेली हे अशाच मोठ्या मनाचे व्यक्तिमत्त्व असून त्यांचे प्रत्येक सामाजिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.”
ते पुढे म्हणाले, “राजकारणात पदासाठी स्पर्धा करणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र मागील निवडणुकीत ‘मला निवडणूक लढवायची नाही’ असे स्पष्टपणे सांगून पदापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देणारे ओंकार तेली यांच्यासारखे कार्यकर्ते दुर्मिळ आहेत. त्यांच्या पाठीशी राणेसाहेबांचा आशीर्वाद आहेच, त्याचबरोबर आम्हीही कायम त्यांच्या सोबत राहू.”
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत ओंकार तेली यांचे अभिनंदन केले. समाजहितासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, सभापती मिलिंद नाईक, संजय पडते, काका कुडाळकर, अरविंद करलकर, प्रसाद रेगे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक विलास कुडाळकर, अभि गावडे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, संजय भोगटे, रेवती राणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपलब्ध करून देण्यात आलेला हा वैकुंठ रथ दुःखाच्या प्रसंगी गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार असून, ओंकार तेली व त्यांच्या कुटुंबीयांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत आणि कौतुक होत आहे.
