You are currently viewing विकास सावंत यांच्या केसरकर संपर्क कार्यालयातील भेटीने तर्कवितर्क.

विकास सावंत यांच्या केसरकर संपर्क कार्यालयातील भेटीने तर्कवितर्क.

संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमध्ये गेले वर्ष दोन वर्षे सुंदोपसुंदी सुरू आहे. विकास सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पद सोडल्यानंतर चंद्रकांत उर्फ बाळा गावडे हंगामी जिल्हाध्यक्ष व नंतर प्रदेश वरून त्यांच्याकडेच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली गेली. त्यामुळे काँग्रेसचे जुनेजाणते कट्टर काँग्रेसी नेते मात्र नाराज झाले आणि वादविवाद सुरू झाले. चार दिवसांपूर्वी मुंबईत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यातही जिल्ह्यातील मतभेद उफाळून आले. यावरून प्रदेश कडूनही कानपिचक्या दिल्या गेल्या होत्या.
याच दरम्यान आज आमदार दीपक केसरकर आपल्या संपर्क कार्यालयात असताना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत हे केसरकरांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले. विकास सावंत अचानक केसरकर भेटीस गेल्यामुळे जिल्ह्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक तर्कवितर्क नोंदविले जात आहेत. विकास सावंत यांचे चिरंजीव आणि मतदारसंघाचे संभाव्य विधानसभेचे उमेदवार बोलले जात असलेले विक्रांत सावंत हे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख आहेत हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. तसेच काँग्रेस हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्याने देखील विकासभाईनी भेट घेतली असेल असेही बोलले जात आहे.
विकास सावंत हे माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे मानसपुत्र आहेत, तसेच जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते असून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी देखील एकवेळ त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देऊ केली होती, परंतु काँग्रेस पक्षावरील निष्ठेपोटी त्यांनी ती नाकारली होती. आज काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले विकास सावंत केसरकरांच्या संपर्क कार्यालय हजर झाल्याने पुत्र प्रेमापोटी ते शिवसेनेत डेरेदाखल होणार काय? असे प्रश्न उभे राहू लागले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या कारकिर्दीत जिल्हा काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत अपयश आले असताना देखील प्रदेश पातळीवरून त्यांची पाठराखण होत असल्याने अनेक जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, नेते नाराज आहेत. याच नाराज एकनिष्ठ काँग्रेस नेत्यांचे प्रमुख असलेले विकास सावंत दीपक केसरकर भेटीस गेल्याने विकास सावंत सेनेची वाट धरतात का???? असा सूर उठू लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 15 =