भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा 2026 अंतिम निकाल जाहीर
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषदेमार्फत आयोजित भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा-2026 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून इयत्ता चौथी आणि सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
इयत्ता सातवीमध्ये सोहम सुधीर गावडे, जि.प. शाळा सावंतवाडी नं. 4 यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. श्रीनिवास बाबुराव मयेकर जि.प.पू. प्रा. शाळा, वेंगुर्ला-3 यांनी द्वितीय तर पूर्वा गजानन राणे जि.प. केंद्रशाळा हिंदळे नं. 1 हिने तृतीय क्रमांक मिळविला.
इयत्ता चौथीमध्ये शार्विल आनंद वरूते, नेरूर चांदोस यांने प्रथम क्रमांक मिळविला. तन्वी तानाजी भोसले जि.प. पू. प्रा. शाळा साळशी नं. 1, ता. देवगड हिने द्वितीय तर शांभवी उत्तम मोहिते जि.प. पू. प्रा. शाळा पुरळ कसबा, ता. देवगड हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
इयत्ता पाचवी व आठवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा व परीक्षांचा सराव व्हावा, स्पर्धात्मक अभ्यासाची सवय लागावी, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी या हेतूने 2018 पासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेमार्फत भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीची परीक्षा 23 एप्रिल 2026 रोजी जिल्ह्यातील एकूण 41 परीक्षा केंद्रावर संपन्न झाली.
यासाठी इयत्ता चौथीच्या परीक्षेसाठी एकुण 4 हजार 168 विदयार्थी व इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी एकूण 1 हजार 846 विद्यार्थी मिळूण एकंदर एकूण 6 हजार 14 विद्यार्थ्यांचा समावेश होता .
इयत्ता चौथीमध्ये 1 हजार 882 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इयत्ता चौथीचा निकाल 47.49 टक्के लागला आहे. तर इयत्ता सातवीमध्ये 239 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इयत्ता सातवीचा निकाल 13.68 टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थ्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती प्रितेश राऊळ यांनी अभिनंदन केले आहे.
