You are currently viewing जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन

जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन

पुणे

मराठी सिने व नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. ६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अभिनेते शंतनू हे चिरंजीव आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे. मोघे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत कवी सुधीर मोघे त्यांचे कनिष्ठ बंधू होत.

मोघे यांनी साठहून अधिक नाटके आणि पन्नासपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटविला. ’अशी पाखरे येती’, तुझे आहे तुजपाशी’, लेकुरे उदंड झाली’, ’वाऱ्यावरची वरात’ अशी त्यांची अनेक नाटके गाजली. त्यातले वाऱ्यावरची वरात आणि ’साक्षीदार’ या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. ’उंच माझा झोका’ आणि ‘अवंतिका’ या मालिकांमध्येही त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, सांस्कृतिक पुरस्कार आदी विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. बेळगाव येथे २०१५ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ’नटरंगी रंगले’ हे यांचे आत्मचरित्रही गाजले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + fourteen =