अमरावती :
मिशन आयएएस ही संस्था विदर्भातील विद्यार्थ्यांना तत्पर तेजस्वी व तपस्वी बनवीत आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू असलेला हा ज्ञान यज्ञ साकार करण्याचे काम या संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी स्वीकारून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे असे उद्गार अभिनंदन बँकेचे पदाधिकारी व जागतिक जैन संघटनेचे उपाध्यक्ष व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री सुदर्शन गांग जैन यांनी काल अमरावती येथे काढले. मिशन आयएएसचे संस्थापक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी वयाची 73 वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री गोविंद कासट मित्रमंडळी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
याप्रसंगी त्यांनी व गोविंद कासट मित्रमंडळींनी सौ विद्या काठोळे व प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचा महावस्त्र व मोत्यांची माळा देऊन सत्कार केला. याप्रसंगी सर्वश्री गोविंद कासट विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकारी प्राचार्य डॉ. शोभा रोकडे महानगरपालिकेच्या माजी पदाधिकारी श्रीमती प्रभा आवारे पर्यावरण कार्यकर्ते प्रवीण वासनिक डॉ. चारुदत्त चौधरी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक राजन देशमुख अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील निवारा केंद्राच्या ज्योती राठोड व राजू बसवनाथे गणेश मोरे नागपूरच्या अध्यापिका रश्मी कावरे विवेक सहस्त्रबुद्धे निलेश ठाकरे मिशन आयएएस च्या सहसंचालिका पल्लवी एरुळकर सेवन हॅबिट चे प्रशिक्षक प्रा आशय रोकडे नरेंद्र तायडे यांनी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे सरांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या संयोजिका व महानगरपालिकेच्या माजी पदाधिकारी श्रीमती प्रभा आवारे यांनी केले. गोविंद कासट मित्रमंडळीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपस्थित सदस्यांचे पुस्तके देऊन काठोळे परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले. या कौटुंबिक कार्यक्रमाला श्री गोविंद कासट मित्र परिवारातील व काठोळे परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
