उपजिल्हा रुग्णालय कार्यालयासमोरील सुकलेल्या आंब्याच्या फांद्या धोकादायक; तातडीने छाटणीची मागणी
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयासमोरील आंब्याच्या झाडाच्या अनेक फांद्या पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत असून त्या वादळी वाऱ्यासह होणाऱ्या मुसळधार पावसात कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने या फांद्यांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
या झाडालगत रुग्णालय परिसरात खाजगी वाहने आणि रुग्णवाहिका नियमितपणे उभ्या केल्या जातात. तसेच बाजूलाच निर्लेखित इमारतही आहे. सुकलेल्या फांद्या कोसळल्यास वाहनांचे मोठे नुकसान होण्याबरोबरच रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी व नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.
सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा वारंवार दिला जात असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, रुग्णालय प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने झाडाची पाहणी करून सुकलेल्या फांद्या हटवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

